- मनोज गडनीस
तुम्हाला जर अमेरिकेला जायचे असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे अमेरिकेचा व्हिसा मिळविणे. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या बहुतांश अर्जदारांना व्हिसा प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहावे लागते; परंतु काही अर्जदारांना मुलाखतीस उपस्थित राहण्यापासून सूट मिळते. म्हणजेच, त्यांना तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नसते. (याला ड्रॉपबॉक्स असेही म्हणतात.)
जर तुम्हाला एफ (विद्यार्थी व्हिसा), एच-१ (वर्क व्हिसा), एच-३, एच-४ नॉन ब्लँकेट, एल, एम, ओ, पी, क्यू किंवा शैक्षणिक व्हिसा, या प्रकारापैकी एखादा व्हिसा मिळालेला असेल आणि तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात किंवा निवासी आहात, तिथे अर्ज केला असेल तर तुम्ही व्हिसा मुलाखतीतून सूट मिळण्यासाठी अर्ज करू शकता.
ज्या अर्जदाराला यापूर्वी व्हिसा नाकारला गेला असेल अशा अर्जदाराला मुलाखतीतून सूट मिळणार नाही. जरी तुम्ही मुलाखतीतून सूट मिळण्याच्या निकषात बसत असाल तरीदेखील कौन्सिलर अधिकारी तुम्हाला अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी विनंती करू शकतात.
ज्या अर्जदारांना व्हिसाचे नूतनीकरण करायचे आहे (त्यांच्याकडे सध्या जो व्हिसा आहे त्याच श्रेणीतील व्हिसासाठी अर्ज केलेला असल्यास) आणि ज्यांच्या व्हिसाची मुदत संपण्यास ४८ महिने शिल्लक आहेत, अशा अर्जदारांनादेखील मुलाखतीतून सूट प्राप्त होऊ शकते. ज्या मुलांचे वय १४ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्या अर्जदारांचे वय वर्षे ८० किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ज्यांचा सर्वांत अलीकडचा अमेरिकेचा व्हिसा नाकारला गेलेला नाही, ते देखील व्हिसा मुलाखतीतून सूट प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करू शकतात. (अमेरिकी कौन्सिलेटच्या सहकार्याने)
अधिक माहितीसाठी - https://travel.state.gov/content/travel/en/News/visas-news/important-announcement-on-waivers-of-the-interview-requirement-for-certain-nonimmigrant-visas.html - https://in.usembassy.gov/visas/frequently-asked-questions/ - https://www.ustraveldocs.com/in/en