प्रश्न- मला अमेरिकेत मास्टर्स डिग्री पूर्ण करायची आहे. हे शिक्षण घेत असताना स्टुडंट (एफ-1) व्हिसावर मला नोकरी करायची परवानगी असेल का?उत्तर- अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राथमिक हेतू अभ्यास असायला हवा. मात्र एफ-1 व्हिसा असल्यावर तुम्ही कामदेखील करू शकता. मात्र त्यासाठी तुम्ही डेजिगनेटेड स्कूल ऑफिशियलशी (डीएसओ) संपर्क साधायला हवा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत अशी व्यक्ती असते. याबद्दलची अतिरिक्त माहिती https://www.ice.gov/sevis/employment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एफ-1 विद्यार्थी म्हणून तुम्ही कॅम्पसमधून मिळालेली नोकरीची संधी स्वीकारू शकता. तुमचं शिक्षण सुरू असताना आठवड्याला 20 तास तुम्ही काम करू शकता. याशिवाय सुट्टी असताना पूर्ण वेळ काम करण्याची परवानगी असते. तुमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पहिल्याच वर्षात तुम्हाला कॅम्पस एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळते. कॅम्पस एम्प्लॉयमेंटचा अर्थ तुमच्या शैक्षणिक संस्थेत किंवा तुमच्या शैक्षणिक संस्थेशी करारबद्ध असलेल्या कंपनीत काम करणं असा होतो. विद्यार्थी त्यांच्या संस्थेशी शैक्षणिकदृष्ट्या संलग्न असलेल्या इतर संस्थांमध्येही (उदाहरणार्थ, संशोधन प्रयोगशाळा) काम करू शकतात. एखादी नोकरी ऑन-कॅम्पस एम्प्लॉयमेंटमध्ये बसते का, याची पडताळणी डीएसओंकडून करुन घ्या. पहिल्या शैक्षणिक वर्षानंतर तुम्ही ऑफ-कॅम्पस एम्प्लॉयमेंटसाठी पात्र ठरता. ऑफ-कॅम्पस एम्प्लॉयमेंटचे दोन प्रकार आहेत. करिक्युलर प्रॅक्टिकल ट्रेनिंग (सीपीटी) ही इंटर्नशिप असते. सीपीटी तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग असते. अनेकदा याचे गुण मिळत असल्यानं तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या फायदा होतो. ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग अंतर्गत येणारी नोकरी तुमच्या अभ्यासाशी संबंधित असते. उदाहरणार्थ, कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी ओपीटीच्या अंतर्गत एखाद्या टेक्नॉलॉजी कंपनीत काम करू शकतो. परदेशातून अमेरिकेत आलेले अनेक विद्यार्थी त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच ओपीटीमध्ये सहभागी होतात. 12 महिन्यांसाठी ओपीटी दिलं जातं. यानंतर तुमच्या शैक्षणिक क्षेत्रानुसार, तुम्ही मुदतवाढीसाठी अर्ज करू शकता. सीपीटी किंवा ओपीटीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला डीएसओंकडून परवानगी घ्यावी लागते. याशिवाय यूएस सिटीझनशिप आणि इमिग्रेशन सेवेची परवानगीदेखील गरजेची असते.एफ-1 व्हिसा धारक विद्यार्थ्यांना नोकरीसंदर्भातील नियमांची माहिती अनेक माध्यमांतून मिळू शकते. तुमच्या शैक्षणिक संस्थेचे डीएसओ आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं कार्यालय यांच्याकडून या संदर्भातील प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. याबद्दलची माहिती https://studyinthestates.dhs.gov/students या संकेतस्थळावर मिळू शकते.
अमेरिकेत मास्टर्स डिग्री करताना काम करण्याची परवानगी असते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 7:19 PM