ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ५ - लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड होऊ शकते. पाकिस्तानी वंशाचे सादीक खान लेबर पक्षाच्या तिकीटावर लंडनच्या महापौरपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे उमेदवार झॅक गोल्डस्मिथ हिंदू आणि शिख मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करत आहेत.
इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये महापौर, विधिमंडळ आणि संसदीय निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. लंडनच्या महापौरपदाची लढाई सर्वाधिक प्रतिष्ठेची आहे. माजी मानवधिकार कार्यकर्ते आणि २००५ पासून लेबर पक्षाचे खासदार असणारे सादीक खान (४५) या निवडणुकीत बाजी मारतील असा सर्वांचा अंदाज आहे.
सादीक खान यांचे वडील बस चालक होते. खान यांनी ही निवडणूक जिंकली तर, युरोपातील सर्वात प्रभावशाली मुस्लिम नेतृत्व म्हणून त्यांचा उदय होणार आहे. माजी पंतप्रधान गॉरडॉन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते.
कॅबिनेट बैठकीला उपस्थित रहाणारे ते पहिले मुस्लिम मंत्री होते. सॉलिसिटर सादीया अहमदबरोबर त्यांचा विवाह झाला. खान यांना दोन मुली आहेत. मी युरोपियन, ब्रिटीश, इंग्लिशन लंडनर आहे असे त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. १९४७ फाळणी झाल्यानंतर सादीक खान यांचे आजी-आजोबा भारतातून पाकिस्तानात गेले. सादीक खान यांचा जन्म होण्याआधी त्यांचे माता-पिता इंग्लंडमध्ये स्थायिक झाले.