ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.12 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे पुरावे जाहीर केल्यास पाकिस्तानचे लष्कर अडचणीत येऊ शकते, मात्र केंद्र सरकारने असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताला युद्ध करण्यात रस नाही. मात्र आमच्यावर युद्ध लादल्यास आम्ही लढायला आणि जिंकायलादेखील तयार आहोत, असे अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. 'उरी' हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर कोणत्याही देशाने आक्षेप नोंदवलेला नाही. उलट या भारताच्या भूमिकेचे बहुतांश देशांनी समर्थनच केले आहे. पाकिस्तानचा जवळचा मित्र मानल्या जाणा-या चीनने देखील या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. भारताच्या दृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे.
लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने हा सर्जिकल स्र्टाईक करण्यासाठी वेळही काळजीपूर्व निवडली होती.
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत,यासाठी न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेली संयुक्त राष्ट्रांची आमसभा संपल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. तसेच, सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने तत्काळ अबुधाबीचे राजपुत्र प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले.
राजनैतिक रणनीतीसाठी आम्ही अमेरिकेसह कुठल्याही देशावर अवलंबून नाही. गेल्या काही वर्षांत आम्ही जरी जगातील वेगवेगळ्या सत्तांशी हातमिळवणी केली असली तरीही आम्ही स्वतःचे निर्णय त्यांच्यावर सोपवले आहेत, असा त्याचा अर्थ होत नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.