स्टॉकहोम: यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यापासून अमेरिकन गीतकार व गायक बॉब डिलन याच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हा पुरस्कार देणाऱ्या स्विडिश अकादमीने आता डिलनशी संपर्क करण्याचा नाद सोडून दिला.गेल्या गुरुवारी डिलन यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा अमेरिकेत लास वेगासमध्ये त्यांचा गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यात त्यांनी या पुरस्काराचा उल्लेखही केला नाही. तेव्हापासून डिलन यांनी पुररस्काराबाबत मौन पाळले आहे.दरवर्षी १० डिसेंबरला स्विडनचे राजे कार्ल गुस्ताफ सोळावे यांच्या हस्ते नोबेल पुरस्कारांचे दिमाखदार कार्यक्रमात वितरण होते आणि त्यानंतर दिल्या जाणाऱ्या शाही मेजवानीप्रसंगी पुरस्कारविजेते आपले मनोगत व्यक्त करतात. पण डिलन यांच्याशी अकादमीचा संपर्क न झाल्याने ते पुरस्कार स्वीकारायला प्रत्यक्ष हजर राहणार की नाही याची अनिश्चितता कायम आहे. (वृत्तसंस्था)>आमच्याकडून आम्ही डिलन यांच्यासी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. मला वाटते तेवढे पुरेसे आहे. पुरस्कार स्वीकारायला ते येतील, असे मला वाटते. त्यातूनही त्यांना यायचे नसेल, तर ते येणारही नाहीत. काही झाले तरी कार्यक्रम होणारच आहे आणि जाहीर झालेला पुरस्कारही त्यांचाच राहणार आहे.- सारा डॅनियस, स्विडिश अकादमी
नोबेल स्वीकारायला डिलन येणार की नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 5:05 AM