इस्लामाबाद : चीनने दिलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. या कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या हवाली करण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे; कारण गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे केंद्र सरकारने ठामपणे वारंवार सांगितले आहे.
गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनला देऊन त्याच्या कर्जातून पाकिस्तान काही प्रमाणात मुक्त होऊ शकतो. मात्र पाकिस्तानच्या या निर्णयामुळे भारत व अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या विरोधामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या मदतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. चीन दक्षिण आशियामध्ये आपला दबदबा वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरच्या प्रदेशात गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश येतो. तो मिळाल्यास चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या हवाली केल्यास त्यातून आंतरराष्ट्रीय तंटा निर्माण होऊ शकतो. गिलगिट-बाल्टिस्तान हा आमचा भूभाग असल्याचे भारताने याआधीच सांगितले आहे. तो भाग पाकिस्तानने बळकाविल्याचा आरोपही भारताने केला होता. हा भाग चीनच्या ताब्यात देण्याचे ठरविल्यास गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्थानिक रहिवासी पाकिस्तानविरोधात बंड पुकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वृत्तसंस्था)
असे आहे गिलगिट-बाल्टिस्तानमधील वातावरण- गिलगिट-बाल्टिस्तान या भागात स्थानिक प्रशासनाला पाकिस्तान सरकारने कमी अधिकार दिले आहेत. तेथील महत्त्वाच्या विषयांवर पाकिस्तान सरकारच निर्णय घेते. - या भागातील लोकांचे रोजगार, पिण्याचे पाणी, शिक्षण, विद्युतपुरवठा या गोष्टींचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. पाकिस्तानात होणाऱ्या आत्महत्यांपैकी ९ टक्के घटना याच भागात होतात. या परिसराचा फारसा विकास झालेला नाही.