रशिया युक्रेन युद्धाची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे युद्ध आता युरोपमध्ये पसरण्याचे संकेत मिळत आहेत. नाटो आणि सदस्य देश रशियासोबत युद्ध करण्याची तयारीला लागले आहेत. असे झाले तर जग तिसऱ्या विश्वयुद्धात लोटले जाणार असून जर्मनीच्या गुप्तचर यंत्रणेने केलेला दावा खळबळ उडवून देणारा आहे.
रशिया पश्चिमी देशांविरोधात युद्ध करण्याची तयारी करत असल्याचे जर्मनीच्या परराष्ट्र गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. नाटोमुळे रशिया मोठा हल्ला करण्याची शक्यता कमी आहे, असेही सांगण्यात आले आहे.
तज्ञांच्या मते, नाटोमध्ये एकी आहे की नाही हे पडताळण्यासाठी रशियाकडे वेगवेगळे मार्ग आहेत. पुतीन हे पुढील सहा ते आठ वर्षे नाटोशी संघर्ष करण्याची तयारी ठेवू शकतात. रशियाकडे युरोपियन देशांना लागून मोठा भूभाग आहे. याचा वापर तो यासाठी करू शकतो.
जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात निर्माण केलेले बंकरचे नुतनीकरण करण्यास सुरुवात केली आहे. पोलंड आणि बाल्टिक देशांसारखे नाटोचे पूर्वेकडील सदस्य आपली सुरक्षा वाढवत आहेत. एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुआनिया यांनी रशिया आणि त्याचा मित्र बेलारूस यांच्या संभाव्य घुसखोरीविरूद्ध सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी करारांवर स्वाक्षरी केली आहे.
नाटो देखील तयारीला लागली आहे. नव्याने सदस्य झालेले स्वीडन आणि फिनलँडच्या लोकांना युद्धकाळात संकटाची तयारी आणि जबाबदारी सांगण्यात येत आहे, यासाठी पत्रके छापण्यात आली आहेत. लिथुआनियामध्ये युद्धामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. नाटोची सारी मदार एअर डिफेन्स सिस्टिमवरच असून ती फेल ठरली तर जमीन, हवा आणि पाण्यातील मोठ्या युद्धाला तोंड फुटणार आहे.