मुंबई : भारत आणि अमेरिका हे जगातील दोन प्रमुख लोकशाही देश असून, आगामी काळात औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, अपारंपरिक ऊर्जा अशा विविध क्षेत्रात दोन्ही देश एकत्रितपणे अधिक ठोस काम करतील, असे मत अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटचे सिनेटर जॉन ऑसोफ यांनी येथे व्यक्त केले. सिनेटर जॉन ऑसोफ यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात मुंबईतून झाली असून, पुढील आठवड्यात ते दिल्लीमध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
गुरुवारी मुंबईत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारत व अमेरिका संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आणि भारत समजून घेण्यासाठी या विशेष दौऱ्यावर आपण आल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थिती या सर्व बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. यात वैद्यकीय शिक्षणासाठी जॉर्जिया येथे भारतातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन मुंबईतील या दौऱ्यादरम्यान ऑसोफ यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच, ऐतिहासिक जामा मशिदीलाही भेट दिली. याखेरीज जय हिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला तसेच धारावीत देखील अनेक लोकांच्या भेटी घेतल्या.