३ वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध आज थांबणार? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अन् पुतिन चर्चा करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 07:47 IST2025-03-18T07:47:11+5:302025-03-18T07:47:52+5:30

"मी मंगळवारी अध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलणार आहे. गेल्या काही दिवसांत बरीच तयारी झाली आहे. आम्ही हे युद्ध संपवू शकतो का, हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्रम्प म्हणाले."

Will the 3-year-old Ukraine war end today President Donald Trump and Putin will hold talks | ३ वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध आज थांबणार? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अन् पुतिन चर्चा करणार 

३ वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध आज थांबणार? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अन् पुतिन चर्चा करणार 

वॉशिंग्टन : ३ वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज, मंगळवारी (१७ मार्च) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. अमेरिकेने रशियाला ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
ट्रम्प यांनी फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला एअर फोर्स वनमधून प्रवास करताना पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, कदाचित मंगळवारपर्यंत काहीतरी मोठी घोषणा करता येईल. मी मंगळवारी अध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलणार आहे. गेल्या काही दिवसांत बरीच तयारी झाली आहे. आम्ही हे युद्ध संपवू शकतो का, हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्रम्प म्हणाले.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सोमवारी सकाळी या चर्चेची पुष्टी केली. मात्र, त्यांनी चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही कधीच अशा बाबी अगोदर जाहीर करत नाही. दोन राष्ट्राध्यक्षांमधील संभाषणाचा तपशील आधीच जाहीर केला जात नाही. रशियाने तीन वर्षांपूर्वी युक्रेनवर हल्ला करत त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यात पूर्ण यश मिळाले नाही. तरीही, रशिया अजूनही युक्रेनच्या मोठ्या भूभागावर ताबा ठेवून आहे.

ट्रम्प यांच्यावर संशय
या चर्चेमुळे युद्धावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्याची संधी ट्रम्प यांनामिळणार आहे. रोपियन देश ट्रम्प यांच्या पुतिन यांच्यासोबतच्या मवाळ भूमिकेबाबत आणि झेलेन्स्की यांच्याशी घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल संशय व्यक्त करत आहेत. झेलेन्स्की यांनी ओव्हल ऑफिसला भेट दिली तेव्हा वाद निर्माण झाला होता.

कोर्टाने सांगूनही स्थलांतरितांना पाठविले तुरुंगात
ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या २६१ स्थलांतरितांना सुपरमॅक्स तुरुंगात पाठवले. अमेरिकेने  त्यांना ड्रग्ज विकणाऱ्या टोळीचे सदस्य म्हटले आहे.
या लोकांना हद्दपार करण्याच्या आदेशाला अमेरिकन कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यानंतरही अमेरिकेने या लोकांना हद्दपार केले. 

२ एप्रिलपासून टॅरिफ, हा स्वातंत्र्याचा दिवस 
पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून नवीन शुल्क (टॅरिफ) लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या शेअर बाजारातील अस्थिरता आणि अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांमुळे चिंता व्यक्त केली जात असली, तरी ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 
२ एप्रिल हा आमच्या देशासाठी स्वातंत्र्याचा दिवस असेल. मागील अनेक मूर्ख राष्ट्राध्यक्षांनी कोणतेही ज्ञान नसताना देशाची संपत्ती इतरांना दिली. आम्ही ती पुन्हा मिळवणार आहोत.
ते आम्हाला जितके शुल्क आकारतात तितके आम्ही आकारणार आाहोत. ऑटोमोबाइल्स, स्टील आणि ॲल्युमिनियमवरही काही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.

हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार
ट्रम्प यांनी सांगितले की, युद्ध संपविण्यासाठीच्या चर्चेमध्ये भूभाग आणि वीज प्रकल्प महत्त्वाचे मुद्दे असतील. आम्ही भूभागाबद्दल बोलणार आहोत. आम्ही वीज प्रकल्पांबद्दल बोलणार आहोत. काही संसाधनांचे विभाजन कसे करायचे, याबाबत चर्चा होईल, असे ट्रम्प म्हणाले.

Web Title: Will the 3-year-old Ukraine war end today President Donald Trump and Putin will hold talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.