वेळोवळी शेजारधर्म म्हणून संकटकाळात धावून जाणाऱ्या भारताविरोधात मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी कठोर भुमिका घेतली आहे. भारतविरोधी असलेल्या मुइज्जू यांनी चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्याहून येताच भारतीय सैन्याने १५ मार्चपर्यंत आपला देश सोडावा, असे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही काळापासून मालदीव आणि भारतात तणावाचे वातावरण आहे. मालदीवच्या जनतेने भारतधार्जिने सरकार पाडून चीनधार्जिने सरकार निवडून दिले आहे. यामुळे मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्याला या नव्या सरकारने विरोध केला आहे. आता मुइज्जू पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते, त्यांनी परतताच भारत विरोधी वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीवने भारतीयांना ट्रोल केले होते. यावरून भारतीयांनी मालदीवला जाण्याचे बेत रद्द करत मालदीवला मोठा धक्का दिला होता. यावरून देखील मुइज्जू यांनी भारताचे नाव न घेता इशारा दिला आहे. आमचा देश छोटा जरी असला तरी कोणाला धमकी देण्याचे लायसन मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर भारतीय सैन्याने आपले सैनिक १५ मार्चपर्यंत माघारी घ्यावेत असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.
मुइज्जू चीनवरून परतताच दोन्ही देशांच्या उच्चाधिकाऱ्यांमध्ये बैठकीची पहिली फेरी झाली आहे. या बैठकीत भारतीय सैन्य माघारी घेण्यावरून परस्पर सहमती बनल्याचा दावा मालदीवने केला आहे.
तर भारत-मालदीव उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पहिली बैठक रविवारी पार पडली. या भेटीत दोन्ही बाजूंनी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली आणि परस्पर संबंध अधिक दृढ करणे आणि भारताच्या सहकार्याने प्रकल्पांची अंमलबजावणी यावर चर्चा झाली, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.