Hamas Delegation in Egypt on war against Israel: इस्रायल हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. पण हे युद्ध ५ वर्षांसाठी थांबवण्याचा प्रस्ताव हमासकडून देण्यात आला आहे. त्यासाठी एक विशिष्ट अटदेखील ठेवण्यात आली आहे. असे असताना हमासचे शिष्टमंडळ सोमवारी इस्रायलकडून मिळालेल्या ओलीसांच्या सुटकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद देण्यासाठी इजिप्तमध्ये पोहोचले होते. येथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन हमासचे शिष्टमंडळ कतारला परतले. युद्धविराम चर्चेत सहभागी असलेल्या एका स्रोताचा हवाला देत एएफपीने सांगितले की, कतारला पोहोचून प्रस्तावावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर यावर प्रतिक्रिया दिली जाईल.
इजिप्तच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित असलेल्या 'अल-काहेरा' वृत्तानुसार, हमासचे शिष्टमंडळ युद्धविराम करारावर आपला लेखी प्रतिसाद पाठवेल. हमास हा प्रस्ताव मान्य करेल, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली आहे. कतार, इजिप्त आणि अमेरिका अनेक महिन्यांपासून हमास आणि इस्रायलमध्ये शांतता चर्चा आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांना यश येणार का, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धबंदीच्या प्रस्तावांमध्ये इस्रायली तुरुंगात बंदिस्त पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसह इस्रायली ओलीसांची सुटका करण्याचा समावेश आहे. नोव्हेंबरमध्ये एका आठवड्याच्या युद्धबंदीचा एक भाग म्हणून, इस्रायलने 80 इस्रायली ओलीस आणि 240 पॅलेस्टाइन नागरिकांचा तुरुंगात सोडले.
युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन सातव्यांदा मध्यपूर्व दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते सौदी अरेबियात पोहोचले. तिथे त्यांनी सौदी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि युद्धविराम व शांतता प्रस्थापित करण्यासाठी GCC-US नेत्यांची भेट घेतली. बुधवारी ब्लिंकन इस्रायल आणि जॉर्डनला रवाना झाले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही हमासला युद्धबंदीबाबत त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.