इस्लामाबाद - काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला जगभरातील कोणत्याही देशाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने पाकचा थयथयाट समोर येऊ लागला आहे. अथक प्रयत्नानंतरही चीन, तुर्कीसारखे देशही पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने हताश झालेला पाकने धर्माच्या नावावर जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी ट्विट करुन काश्मीर प्रश्नावर जगातील देशांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर जगातील मुस्लिमांना कट्टरता वाढून हिंसाचाराला बळ मिळेल असा दावा केला आहे.
कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? जिहादच्या नावाखाली पाकिस्तानकडून जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जर जगाने काश्मीर प्रश्नी वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील, त्याचे पडसाद जगातील मुस्लिमांवर होऊन कट्टरता वाढेल आणि हिंसाचाराला सुरुवात होईल.
भारताने 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 संविधानातून हटविण्याचा आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करुन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचं जाहीर केले. भारताच्या या ऐतिहासिक निर्णयावर पाकिस्तानकडून विरोध होऊ लागला. त्यामुळे जगभरातील देशांकडून पाठिंबा मिळावा यासाठी पाकच्या पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केले मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
बुधवारी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जर युद्ध झालं तर त्यासाठी जगातील अन्य देश जबाबदार असतील असं वक्तव्य केलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून मोठी कारवाई होऊ शकते या भीतीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे भारताला युद्धाची धमकी देत आहे. भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले होते. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध झाल्यास त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान विरोध प्रदर्शन करेल. पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर सैरभैर झाल्याचं पाहायला मिळालं आहे