लंडन – गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. कोरोनाच्या महामारीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी रात्रंदिवस मेहनत करून लस शोधून काढली. कोरोना लसीचा पहिला डोस घेणारा जगातील सर्वात पहिले पुरुष(First Man In The World To Get Covid Jab) असलेल्या ८१ वर्षीय विलियम शेक्सपियर(William Shakespeare) यांचे निधन झालं आहे. शेक्सपियर हे अन्य आजाराने ग्रस्त होते.
विलियम शेक्सपियर यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात Pfizer BioNTech ची कोरोना लसीचा डोस घेतला होता. जगात कोरोना लसीचा पहिला डोस घेणारे विलियम हे सर्वात पहिले पुरुष होते. विलियम यांच्या काही मिनिटांआधी यूनिवर्सिटी रुग्णालयात ९१ वर्षीय मार्गरेट कीनन(Margaret Keenan) यांनी कोरोनाची लस घेतली होती. एका इंग्रजी दैनिकाने त्यांच्याबद्दल वृत्त छापलं आहे.
या वृत्तानुसार शेक्सपियर यांचे मित्र कोवेन्ट्रीचे नगरसेवक जेने इन्स यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी विलियम शेक्सपियर यांचे निधन झाले. शेक्सपियर यांना अनेक गोष्टींसाठी ओळखलं जातं. त्यात शेक्सपियर हे जगातील पहिले पुरुष आहेत ज्यांनी सर्वात आधी कोरोनाची लस घेतली होती. माझ्या मित्राला श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी लसीकरण करावं असं आवाहन त्यांनी केले आहे.
Stroke मुळे जीव गेला
यूनिवर्सिटी रुग्णालयाने सांगितले की, शेक्सपियर यांचे निधन स्ट्रोक आल्याने झाला आहे. शेक्सपियर यांनी पॅरिश येथे नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याच हॉस्पिटलमध्ये विलियम यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता आणि इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहिल्या लसीचा डोस घेतल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केल्याची आठवण हॉस्पिटलने केली.
विलियम शेक्सपियर यांच्या मागे त्यांच्या पत्नी जॉय. दोन मुलं, सून आणि नातवंडे असं कुटुंब आहे. वेस्ट मिडलैडस लेबर ग्रुपने सांगितले की, शेक्सपियर यांना बिल नावानंही ओळखलं जायचं. कोविड १९ लसीकरणानंतर जागतिक स्तरावर त्यांचे नाव झालं होतं. पक्षासाठी त्यांनी अनेक दशकं सेवा केली. कामगार पक्षाचे नेते म्हणून त्यांना मान्यता होती. या दुखा:च्या प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबीयासोबत आहोत असं त्यांनी सांगितले.