आज जगाने ८ अब्ज एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. जगाची एकूण लोकसंख्या आता ८०० कोटींवर पोहोचली असून, हा मानवाच्या इतिहास व विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. जागतिक स्तरावर वाढत्या लोकसंख्येबरोबरच अन्न, पाणी यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. हवामान बदलामुळे ऋतूचक्रात बदल होत असून, त्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस यांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना संयुक्त राष्ट्रांनी चीन आणि भारतातील अंतर हे अवघे १७.७ कोटी लोकसंख्येचे असून पुढील वर्षी लोकसंख्येत मोठा वाटा हा भारताचा असणार असल्याचे म्हटले आहे.
२०३० सालापर्यंत जगाची लोकसंख्या ८.५ अब्जांवर पोहोचणार आहे. २०५० मध्ये हाच आकडा ९.७ अब्ज, तर २०८० मध्ये १०.४ अब्जांवर पोहोचणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी याआधीच व्यक्त केला आहे. २०८० नंतर जगातील लोकसंख्येत वाढ होणार नाही. २०८०मध्ये जगाची जितकी लोकसंख्या असेल, तितकीच ती २१०० सालीही राहण्याची शक्यता आहे.
२०२१ साली भारताची लोकसंख्या १.३९ अब्ज, तर चीनची लोकसंख्या १.४१ अब्ज होती. मात्र २०२३ साली लोकसंख्येबाबत भारत चीनला मागे टाकणार आहे. जगातील संभाव्य महाशक्ती अशी ओळख असलेला भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणूनही पुढील वर्षीपासून ओळखला जाणार आहे.
युएन पॉप्युलेशन फंड (UNFPA) ने जागतिक लोकसंख्या आठ अब्जांपर्यंत पोहोचल्याबद्दल एका विशेष ग्राफिक प्रसिद्ध केले आहे. यात आशिया खंड आणि आफ्रिका खंडाने बरीच लोकसंख्या वाढविली असल्याचे म्हटले आहे. 2037 पर्यंत पुढील एक अब्जाची भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील वर्षी १७.७ कोटी लोकसंख्या वाढवून भारत या आठ अब्जांच्या लोकसंख्येचा मोठा भागीदार असेल असेही युएनने म्हटले आहे. दुसरीकडे चीनची लोकसंख्या घसरण्यास सुरुवात होणार असल्याचेही म्हटले आहे.