ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २५ - भारत - पाकिस्तानमधील चर्चा रद्द झाली असतानाच भारतासोबत काश्मीर प्रश्न वगळून कोणतीही चर्चा करणे निरर्थक असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील फुटिरतावादी नेते हे चर्चेतील तिसरा पक्ष नसून एक महत्त्वाचा पक्ष आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारत - पाकमध्ये दहशतवाद्याच्या मुद्द्यांवरच चर्चा होणार असे भारताने खडसावल्यानंतर पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा रद्द केली होती. काश्मीर प्रश्नावरही चर्चा करण्याचे पाकचे म्हणणे होते व भारताने पाकचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतविरोधी भूमिका घेतली. काश्मीरमधील फुटिरतावादी नेत्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय काश्मीर प्रश्नावर चर्चा होणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. नवाझ शरीफ यांच्या या भूमिकेवर भारताकडून काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.