ऑस्ट्रेलियामध्ये एक अजब प्रकरण समोर आले आहे. एका महिलेला तिने तिच्या बॉसला शिवीगाळ केल्यामुळे नोकरीवरून काढून टाकले आहे. आता त्या महिलेने असे पाऊल उचलले की कंपनीलाच आता त्या महिलेला साडे चार लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एका न्यूज एजन्सीनुसार 56 वर्षीय महिलेने सर्वांच्या समोर आपल्या बॉसला अपशब्द बोलले होते. यानंतर बॉसने मॅनेजमेंटसोबत मिटिंग घेऊन त्या महिलेला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला. महिलेला जेव्हा याबाबत समजले तेव्हा तिने कंपनीला आणि बॉसला धडा शिकविण्याचे ठरविले.
तिने याविरोधात स्थानिक न्यायालयात धाव घेतली आणि कारवाई करण्याची मागणी केली. कंपनीने देखील न्यायालयात साक्षीदार सादर केले. या प्रकरणी महिलेने बॉसला खरोखरच अपशब्द बोलल्याचे निदर्शनास आले. याशिवाय महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत देखील चुकीच्या पद्धतीने वागत होती. अनेकदा ती वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कपड्यांवर आणि शरीरावर विचित्र कमेंट करायची. हे सारे कंपनीकडून न्यायालयासमोर ठेवण्यात आले.
या साऱ्या पुराव्यांवरून न्यायालयाने देखील महिलेची चूक मान्य केली. मात्र, कंपनीलाही त्यांनी केलेली चूक सांगितली. महिलेला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नोकरीवरून काढून टाकले. हे योग्य नाहीय. यामुळे तिला नुकसान भरपाई द्यावी लागेल. तिच्यावरील आरोपांनंतरही ती नोटीस पिरिएडसाठी पात्र होती. या काळात ती दुसरी नोकरी शोधू शकेल, मात्र, कंपनीने तिला तडकाफडकी कामावरून काढून टाकले.
आता न्यायालयाने कंपनीला त्या महिलेला 4.56 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तिला दुसऱ्या ठिकाणी काम शोधण्यास सांगितले आहे.