दुसऱ्या महायुद्धाला ७५ वर्षांचा काळ लोटला असला तरी आजही जगभरात विविध ठिकाणी युद्धाच्या खाणाखुणा सापडतात. दगडाप्रमाणे दिसणारे बॉम्ब आढळण्याचे अनेकदा समोर येतात. या महायुद्धाबाबतच्या अनेक आश्चर्यकारक घटना आजही समोर येतात. अशीच घटना लंडनमध्ये घडली आहे. ४९ वर्षांच्या लूल किरोलो नेहमीप्रमाणे त्यांचा बगीचा स्वच्छ करण्याचं काम करत होत्या. त्यावेळी एक विचित्र आकाराचा दगड त्यांच्या दृष्टीस पडला. मातीत माखलेला दगड समजून किरोलो यांनी तो बगीच्यात खेळत असलेल्या कुत्र्याजवळ फेकला. काही वेळाने त्यांना त्या दगडाबद्दल थोडी शंका वाटली. त्यांनी तो दगड पुन्हा उचलला आणि त्याची पडताळणी करण्याचं ठरवलं. त्या दगडाचा आकार नीट पाहिल्यावर किरोलो यांच्या मनातील उत्सुकता वाढली. त्यांनी त्या दगडाचा फोटो फेसबुकवर शेअर केला आणि त्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का ते जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू केले.
शेअर केलेल्या फोटोवर आलेल्या कमेंट वाचून किरोलो यांना जोरदार धक्का बसला. हा दगड नसून बॉम्ब नसल्याची माहिती अनेकांनी कमेंटमध्ये दिली होती. बगीच्यात सहज सापडलेला दगड जिवंत बॉम्ब असल्याचं समजल्यावर किरोलो यांना धडकी भरली. त्यांनी तातडीनं पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकालादेखील बोलावण्यात आलं. त्यांनी केलेल्या पडताळणीतून तो दगड नसून जिवंत बॉम्ब असल्याचं सिद्ध झालं.किरोलो यांना बगिच्यात सापडलेला तो विचित्र दगड दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब होता. हा बॉम्ब जिवंत असल्याने तो सुरक्षितपणे निकामी करण्याचं आव्हान होतं. या बॉम्बमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून तो समुद्रात निकामी करून फेकण्यात आला.