ऑनलाइन लोकमत
जेद्दाह, दि. १७ - वॉट्स अॅपवर पुरुषाचा अपमान केला म्हणून सौदी अरेबियातील न्यायालयाने एका महिलेला चाबकाचे ७० फटके मारण्याची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाने महिलेला तब्बल पाच हजार डॉलर्सचा दंडही ठोठावली आहे.
सौदी अरेबियातील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पूर्व सौदी अरेबियातील अल कातिफ कोर्टात एका पुरुषाने महिलेविरोधात याचिका दाखल केली होती. संबंधीत महिलेने वॉट्स अॅपवर अपमान करुन माझी प्रतिमा मलिन केली असे या तक्रारदार पुरुषाचे म्हणणे होते. महिलेनेही कोर्टासमोर पुरुषाचा वॉट्स अॅपवर अपमान केल्याची कबुली दिली. यानंतर कोर्टाने महिलेला दोषी ठरवत तिला चाबकाचे ७० फटके मारण्याची शिक्षा सुनावली. याशिवाय ५, ३३२ डॉलर्सचा ( सुमारे ३ लाख ३४ हजार रुपये) दंडही ठोठावला. महिलेने वॉट्स अॅपवर नेमके काय विधान केले होते, महिलेचे राष्ट्रीयत्व याविषयीची माहिती समोर आलेली नाही.
सौदी अरेबियातील सायबर अॅक्टनुसार तंत्रज्ञानांच्या मदतीने दुस-यांची प्रतिमा मलिन करणे हा गुन्हा असून यानुसार एक वर्षाचा तुरुंगवास किंवा ५ लाख सौदी रियाध (सौदीतील चलन) असा दंड आहे. गेल्या वर्षी जुलैमध्येही दोघा महिलांना वॉट्स अॅपवर एकमेकांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी १० दिवसांचा तुरुंगवास व चाबकाचे २० फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.