पॅरिस : रागाच्या भरात केलेल्या कृत्यांमुळे होत्याचे नव्हते होऊन जाते. पॅरिसमध्ये अशीच घटना घडली आहे. एका महिलेने शेजाऱ्यासोबत झालेल्या वादातून कार पेटवली. ही आग पूर्ण इमारतीमध्ये पसरली आणि जळून 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिलेला अटक करण्यात आली आहे.
पॅरिसच्या अरलैंगर स्ट्रीटवर ही इमारत आहे. येथेच प्रिंसेस सॉकर स्टेडियम आहे. सोमवारी रात्री १ वाजता ही घटना घडली. महिलेने कारला आग लावली. ही आग इमारतीच्या 7 व 8 व्या मजल्यावर पसरली. या आगीमध्ये 30 हून अधिकजण जखमी झाले असून यामध्ये 6 अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर 50 जणांना इमारतीच्या बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
धुर आणि आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी गच्चीवर जाण्यासाठी धावपळ केली. यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती झाली होती, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.