रशियामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे जवळपास 20 मांजरांनी एका महिलेवर हल्ला करत तिचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. मांजरांनी या महिलेला एवढे चावे घेतले, की त्या महिलेचा मृत्यू झाला. पुलिसांना तिचा मृतदेह दोन आठवड्यांनंतर आढळून आला. यात तिच्या शरिराचा काही भागच शिल्लक राहिलेला होता. हे संपूर्ण दृष्यपाहून पोलिसांनाही धक्का बसला.
संबंधित महिलेच्या एका सहकाऱ्याने ती बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. यात, ती तिच्या बॉससोबत संपर्क साधू शकत नसल्याचे म्हणण्यात आले होते. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांना महिलेचा अर्धवट खाल्लेला मृतदेह तिच्या घरात सापडला. तेव्हा तिच्या मृतदेहाला भुकेल्या मांजरींनी वेढलेले होते. दोन आठवड्यांपूर्वीच संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण तिचे शरीर सडायला लागले होते. ही घटना रशियातील रोस्तोवमध्ये बटायस्क भागात घडली.
मांजरींना घरात एकटंच सोडलं होतं - यासंदर्भात बोलताना अॅनिमल रेस्क्यू एक्सपर्ट म्हणाले, "या मांजरांना दोन आठवड्यांपासून घरात एकटेच सोडण्यात आले होते. त्यांच्या खाण्यासाठी काहीही नव्हते. यामुळे मांजरं उपाशी होती. अशा परिस्थितीत त्यांनी संबंधित महिलेवर हल्ला केला आणि त्यांना एवढ्या दिवसांनंतर जे मिळाले ते त्यांनी खाल्ले."
'भूकेमुळे हिंसक झाल्या मांजरी' -ज्या मांजरांनी महिलेचा जीव घेतला, त्या जगभरात अत्यंत प्रसिद्ध आहेत. लोक त्यांना घरात पाळणे अत्यंत पसंत करतात. सर्वसाधारणपणे त्यांचा व्यवहार अत्यंत सौम्य असतो. एक्सपर्ट्सच्या मते भूकेमुळे या मांजरांनी हे हिंसक कृत्य केले.