सुझोऊ (जियांगसू प्रांत, चीन) : स्वत:च्या मुलाची होणारी पत्नी ही आपलीच खूप वर्षांपूर्वी हरवलेली मुलगी आहे, हे आईने ओळखल्यावर तिला आनंदाचे अश्रू आले. हा आनंदाचा धक्का तिला प्रत्यक्ष लग्न समारंभात बसला. ही सुखद घटना ३१ मार्च रोजी सुझोऊमध्ये घडली.मुलाच्या आईला नियोजित सुनेच्या हातावर जन्मखूण दिसली. तिची जी मुलगी हरवली होती तिच्याही हातावर अशीच खूण होती. ती खूण दिसल्यावर मुलाच्या आईने वधूच्या पालकांना विचारले की, तिला तुम्ही २० वर्षांपूर्वी दत्तक घेतलेले आहे का? या प्रश्नाने त्यांचा गोंधळ उडाला कारण ते एक गुपित होते.पालकांनी सांगितले की, “आम्हाला किती तरी वर्षांपूर्वी अगदी छोटी मुलगी रस्त्याच्या कडेला सापडली व तिला आम्ही आमची मुलगी म्हणूनवाढवले.” हा घटनाक्रम ऐकल्यावर मुलगी वधूचे डोळे भरून आले. तिला आपल्या जैविक आई व वडिलांबद्दल आणखी माहिती हवी होती. ती म्हणाली, “माझ्या खऱ्याखुऱ्या आईला भेटतेय हा क्षण लग्नाच्या दिवसापेक्षाही आनंदाचा आहे.” ही कथा येथेच संपत नाही. कारण आणखी काही घडणार होते.दत्तक घेतलेला मुलगाच झाला जावईआपल्या मोठ्या भावाशी कसे लग्न करायचे याची काळजी ती करीत होती. तथापि, सासूने तिला सांगितले की, मुलगाही दत्तक घेतलेला असल्यामुळे या लग्नाला आक्षेप घ्यावे, असे काही नाही. बेपत्ता मुलगी सापडण्याच्या सगळ्या आशा संपुष्टात आल्यावर महिलेने मुलगा दत्तक घेतला होता. तिने मुलीचा अनेक वर्षे शोध घेतला, पण उपयोग झाला नाही, असे ओरिएंटल डेलीने वृत्त दिले. मुलगा आणि मुलगी हे रक्ताचे नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्या लग्नात काही अडचण नाही, असे ही महिला म्हणाली. वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यावर त्या जोडप्याने रीतसर लग्न केले व दत्तक घेतलेला मुलगा या प्रसंगामुळे जावयात रूपांतरित झाला.
हरवलेली मुलगी सून बनून घरी परतते तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:36 AM