हनोई - व्हिएतनाम येथे एका महिलेने 7.1 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. दक्षिण आशियाई देशातील हे सर्वात वजनाचे बाळ ठरले आहे. महिला आणि बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याचं सांगितलं जात असून, काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.
बाळाचे वडील त्रान वान कुआन यांनी सांगितलं की, 'जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, तुमचं बाळ 7.1 किलो वजनाचं आहे. तेव्हा आमचा कोणाचा विश्वासच बसत नव्हता'. डॉक्टरांनी प्रसूती करण्याआधी बाळाचं वजन जवळपास पाच किलो असेल अशी कल्पना आई आणि वडिलांना दिली होती. व्हिएतनाममध्ये एवढ्या वजनाचं बाळ जन्मण्याची ही काही पहिलीच घटना नाही. 2008 रोजीदेखील एका महिलेने सात किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला होता.
हे बाळ या दांपत्याचं दुसरं अपत्य आहे. 2013 रोजी महिलेने 4.2 किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार आतापर्यंत सर्वात जास्त वजनी बाळ इटलीत जन्मलेलं आहे. या बाळाचं वजन 10.2 किलो होतं. इटलीमध्ये 1995 रोजी एका महिलेने या बाळाला जन्म दिला होता.
कोल्हापुरात जन्मले राज्यातील सर्वाधिक ५ किलो वजनाचे आणि सर्वाधिक उंचीचे बाळ कोल्हापूर येथील राजारामपुरीतील जननी हॉस्पिटलमध्ये राज्यातील सर्वाधिक ५ किलो वजनाचे आणि सर्वाधिक उंचीचे बाळ जन्मले आहे. विशेष म्हणजे मोठे बाळ असूनही आईची नैसर्गिक प्रसुती झाली असून हे कोल्हापुरातील प्रसुतिशास्त्रातील पहिलेच उदाहरण आहे. प्रसुती झालेल्या महिलेचे हे दुसरे बाळंतपण असून त्या पुण्यात राहतात.
माहेर कोल्हापुरात असल्याने त्या प्रसुतीसाठी येथे आल्या. त्या डॉ. सरोज शिंदे यांच्याकडे उपचार घेत होत्या. एखाद्या बाळाची उंची किंवा वजन जास्त असेल तर मातेची नैसर्गिक प्रसुती होत नाही. मात्र, या बाळाच्या मातेची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे वजन ५ किलो तर उंची ६० सेंटिमीटर इतकी आहे.
वजन आणि उंची दोन्हीच्या जास्त असलेले हे राज्यातील पहिले बाळ आहे. यापूर्वी गुजरातमधील बडोद्यात ५ किलो ८०० ग्रॅम वजनाचे व महाराष्ट्रात ५ किलो वजनाची बालके जन्मली आहेत. मात्र, बहुतांश बालकांच्या जन्मासाठी मातेचे सिझेरियन करावे लागले आहे. राज्यात पहिल्यांदाच हे पाच किलो वजनाचे बाळ नैसर्गिकरित्या जन्मले आहे.