मेट्रो स्टेशनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म; कीव्ह येथे भर युद्धात गोड बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 08:28 AM2022-02-27T08:28:33+5:302022-02-27T08:30:15+5:30
मेट्राे स्थानकावर आश्रय घेणाऱ्या एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे.
कीव्ह : रशिया आणि युक्रेनच्या युद्धमुळे लाखाे नागरिकांवर संकट आले आहे. रशियाकडून कीव्हमध्ये बाॅम्बवर्षाव करण्यात येत आहे. अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, या काळातही युक्रेनची राजधानी किव्हमध्ये मेट्राे स्थानकातून एक गाेड बातमी आली आहे. मेट्राे स्थानकावर आश्रय घेणाऱ्या एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. या चिमुकल्याचा फाेटाे ट्वीटरवर पाेस्ट करण्यात आला आहे. बहुतांश मेट्राे स्थानके अंडरग्राउंड आहेत. त्यामुळे त्यांचा शेल्टर हाेम म्हणून वापर करण्यात येत आहे. अशा ठिकाणी जास्त सुरक्षित असल्याचे नागरिकांना वाटत आहे. अनेक रुग्णालयांमधून लहान बाळांना अशा ठिकाणी आणून उपचार करण्यात येत आहे.
युक्रेनच्या सैनिकाने स्वत:ला उडविले
रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले असताना युक्रेनचे सैनिक अतिशय धाडसाने या हल्ल्यांचा प्रतिकार करत आहेत. युक्रेनचा जवान विटाली स्काकुन वोलोडिमिरोविच याने रशियाच्या सैन्याला रोखण्यासाठी एका पुलावर स्वत:ला उडविले आणि पूल उद्ध्वस्त केला. त्यामुळे हे सैन्य हेनिचेस्क पुलावरून पुढे जाऊ शकले नाही. युक्रेनने या वीर जवानाची स्तुती करत फेसबुकवर पोस्ट केली आहे की, अतिशय धाडस दाखवत या जवानाने रशियाच्या सैन्याला रोखले.