संसदेचं कामकाज सुरू असताना काही जण झोपतात तर काही जण गेम खेळतात असे विविध प्रकार जगभरात समोर आले आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक महिला खासदार संसदेत कामकाज सुरू असताना ऑनलाईन शॉपिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. मलेशियामध्ये ही घटना घडली आहे. महिला खासदार संसदेत जीन्स आणि टॉपची ऑनलाईन खरेदी करताना दिसल्या आहेत. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
मलेशियाचे माजी खासदार वी चू केओंग यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर गाझी बूटा नावाच्या महिला खासदाराचा फोटो पोस्ट केला गेला आहे. फोटोत या महिला खासदार त्यांच्या लॅपटॉपवरून 'जीन्स आणि टॉप' ऑर्डर करताना दिसत आहेत. या ट्वीटमध्ये माजी खासदाराने महिला खासदारावर आरोप केला आहे की, त्या कोणतंही काम न करता फुकट पगार घेत आहेत आणि मलेशियाची संसद म्हणजे सर्कस झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मलेशियाचे माजी पंतप्रधान दातुक सेरी नजीब रझाक यांनीही महिला खासदाराचा हा फोटो पाहिला आणि शेअरही केला. महिला खासदाराची खिल्ली उडवत माजी पंतप्रधानांनी लिहिलं, कदाचित या महिला खासदार त्यांचे सरकार आल्यानंतर वस्तूंच्या वाढलेल्या किमती पाहत आहेत. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत या महिला खासदाराची जोरदार खिल्ली उडवली आणि काही नेटकऱ्यांनी संसदेचं कामकाज सोडून ऑनलाईन शॉपिंग केल्यामुळे टीकाही केली.
फोटो व्हायरल झाल्यानंतर महिला खासदाराला स्वतःची बाजू स्पष्ट करावी लागली. 'शॉपिंग करत नव्हते. तर फोटोमध्ये कैद झाली ती त्यांच्या लॅपटॉपवरील जाहिरात होती' असं म्हटलं आहे. जाहिरात दिसत असतानाच कोणीतरी फोटो काढला आणि आता तो शेअर केला जात आहे. सरकारकडे टीका करण्यासाठी कोणताच दुसरा मुद्दा नाही त्यामुळेच ते अशा गोष्टीने वाद निर्माण करत आहेत असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.