केळ्याचा समावेश पोषक तत्व असलेल्या गोष्टींमध्ये होतो. व्यायाम करणारी मंडळी रोजच केळी खातात. सर्वांनाच परवडतील अशा दरात केळी उपलब्ध असतात. मात्र 100 रुपयांच्या केळ्यांसाठी आता एका महिलेला तब्बल 1 लाख 60 हजार रुपये मोजावे लागल्याची घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली आहे. द टेलिग्राफने दिलेल्या रिपोर्टनुसार, Cymbre Barnes असं या लंडनमध्ये राहणाऱ्या महिलेचं नाव आहे. ऑफिसला जात असताना एका रिटेल स्टोरवरून तिने केळ्याची खरेदी केली. केळ्यांची किंमत ही 1 पाउंड स्टर्लिंग म्हणजेच जवळपास 100 रुपये होती.
महिलेने घाईत असल्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून पेमेंट केलं. 1 पाउंड स्टर्लिंगसाठी तिने ओके दाबलं असता तिच्या अकाऊंटमधून 1,602 पाउंड स्टर्लिंग म्हणजेच जवळपास 1,60,596 रुपये कमी झाले. याबाबतचा एक मेसेज देखील तिच्या फोनवर आला. दुकानात खूप गर्दी असल्याने तिने मेसेज लगेच पाहिला नाही. नंतर जेव्हा तिने फोनवर पैसे गेल्याचा मेसेज पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. मात्र तोपर्यंत उशीर झाला असून बिलिंग झालं होतं. ऑनलाईन पेमेंट करणं महिलेला भारी पडलं.
जवळपास दीड लाख कमी झाल्याचं लक्षात येताच महिला मॅनेजरकडे गेली आणि रिफंडची मागणी केली. त्यावेळी तिला काही तांत्रिक अडचणींमुळे त्या शॉपमध्ये याचा रिफंड (Refund) मिळू शकत नाही. दुसऱ्या शाखेत गेल्यास तिला रिफंड मिळेल, असं सांगण्यात आलं. स्टोर शोधण्यासाठी तिला 45 मिनिटं चालावं लागलं. महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा कंपनीने आपली चूक कबूल केली आणि दिलगिरी व्यक्त केली. तसेच महिलेला तिचे पैसे परत केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.