ऑनलाइन लोकमत
बँगकॉक, दि. 20- अनेकदा चोर, दरोडेखोर, खुनी लोकांना शिक्षा झालेलं तुम्हाला माहीत असेल. मात्र थायलंडमध्ये चक्क एका महिलेला क्षुल्लक शब्दावरून जेलमध्ये टाकण्यात आलंय. थायलंडमधल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या आईला फेसबुकवरील तिच्या मॅसेज बॉक्समध्ये आलेल्या एका मॅसेजमुळे राज्याचा अपमान झाल्याचं कारण देत 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पटनरी चंकीज या 40 वर्षांच्या असून, त्या मोलकरणीचं काम करून स्वतःचा उदरनिर्वाह भागवतात. थायलंड लष्कराच्या जंता लेसे-मॅजेस्टी कायद्यानुसार पटनरी चंकीज यांनी थायलंडमध्ये अधिक काळ सत्ता गाजवलेला राजा भूमिबोल अदुल्यादेजसह राणी आणि युवराजांचा अपमान केलाय. थायलंडच्या नव्या कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. जंता लेसे-मॅजेस्टी या कायद्यांतर्गत 2014 रोजी लष्कराला विशेषाधिकार देण्यात आलेत. "पटनरींनी फक्त फेसबुकवर आलेल्या मॅसेजला रिप्लाय देण्यासाठी 'जा' या शब्दाचा प्रयोग केला. 'जा' या शब्दाचा अर्थ 'हो' असा होतो. त्या व्यक्तीच्या टीकेला समर्थन देण्यासाठी कुठलाही करार केला नव्हता. तो मॅसेज सार्वजनिकही करण्यात आला नव्हता. त्यामुळे या प्रकरणात कोणाचाही अपमान झाला नाही",असं स्पष्टीकरण पटनरींचे वकील पूनसुक यांनी कोर्टात दिलं आहे. मॅसेज पाठवणा-या 28 वर्षीय बुरीन इनटिनला गेल्याच महिन्यात अटक झालीय. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू असताना पटनरींनी योग्यरीत्या सहकार्य केले नसल्याचं म्हटलं आहे. "थायलंडचं लष्कर जंता लेसे-मेजस्टी कायद्यांतर्गत लोकांना गुन्हेगार ठरवू पाहतं आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारनं या कायद्यांतर्गत 57 जणांविरोधात खटला भरला, त्यातल्या 44 जणांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती", अशी माहिती मानवी हक्क आयोगाकडून देण्यात आलीय. एका कारखान्यात काम करणा-या कामगारानं राजाच्या कुत्र्याचा अवमान केल्याप्रकरणी तपास अद्याप सुरू असल्याची माहिती आता समोर येते आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह अथवा वादग्रस्त वक्तव्य केल्यास त्याची जबाबदारी घ्यायला शिका, असं गुन्हेगार प्रतिबंधक विभागाचे मुख्य पोलीस कोलोमन ओलार्न म्हणालेत. कोलोमन यांनी मीडियालाही याबाबत जास्त वृत्तांकन न करण्याचा सल्लावजा इशाराच दिला आहे.