उंच उंच पर्वत सर करून तिथे फक्त बिकिनीमध्ये फोटो काढणाऱ्या एका महिला हायकरचा थंडीमुळे मृत्यू झाला असून ती 36 वर्षांची होती. तायवानमध्ये राहणाऱ्या या हायकरचं नाव गिगू वू असून ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या हटक अंदाजासाठी चर्चेत असायची. तिच्या फॅन्समध्ये ती बिकीनी हायकर म्हणून प्रसिद्ध होती. पर्वत सर करतानाच्या बिकीनीतील आपल्या ग्लॅमर्स फोटोंमुळे ती आपल्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली होती.
तायवानमधील युशान या बर्फाच्छादीत पर्वतावरून 65 फूट खोल दरीत कोसळून गिगूचा मृत्यू झाला आहे. दरीत कोसळल्यानंतर तिन आपल्या एका मित्राला सॅटेलाइट फोनवरून संपर्क केला होता. त्यावेळी आपण दरीत कोसळलो असून जखमी झाल्याचेही तिने सांगितले होते. मित्राने आपातकालीन विभागाला फोन करून तिला मदतीची गरज असल्याचे सांगितले होते. परंतु, मदत पोहोचण्याआधीच तिचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गिगूचा मृत्यू हाइपोथर्मियाने (Hypothermia) झाला आहे. हायपोथर्मिया स्थितीमध्ये शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर अधिकाधिक थंड पडू लागतं.
आपातकालीन विभागाने गिगूच्या बचावासाठी तत्काळ हेलिकॉप्टर पाठवलं होतं. परंतु खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर गिगूपर्यंत पोहोचू शकलं नाही. जवळपास 28 तासांनंतर आपातकालीन विभागाला गिगूपर्यंत पोहोचण्यात यश आलं. परंतु तोपर्यंत गिगूचा दुर्दैवी अंत झाला होता. तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी याआधीही 3 वेळा हेलिकॉप्टर पाठवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु खराब हवामानामुळे त्यांना परतावे लागले.
साधारणतः एक आठवड्याआधी गिगू एकटीच पर्वत सर करण्यासाठी गेली होती. मित्राला फोन केल्यावर तिने सांगितले होते की, ती एका दरीमध्ये पडलेली असून ती जबर जखमी झाली होती. एवढचं नव्हे तर तिला हालचाल करणंही शक्य नव्हतं.
गिगूच्या मित्राने नैनतू फायर सर्विससोबत बोलताना सांगितले की, गिगू तायवानच्या सर्वात उंच पर्वताच्या शिखरावर चढण्याचा प्रयत्न करत होती, त्या प्रयत्नातच ती दरीत कोसळली होती. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर गिगू नेहमीच अॅक्टिव्ह असून तिचे ग्लॅमरस फोटो ती नेहमीच अपलोड करत असे.