लाहोर: एकीकडे अफगाणिस्तानात तालिबानच्या आगमनानंतर संपूर्ण जग महिलांविषयी चिंता व्यक्त करत आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो. त्या दिवशी जमावाकडून कपडे फाडत मारहाण करण्यात आल्याचा आरोप एका पाकिस्तानी महिलेने केला आहे.
डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार- तक्रारदार महिलेने लॉरी अड्डा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ती तिच्या मित्रांसोबत स्वातंत्र्यदिनी मिनार-ए पाकिस्तानजवळ व्हिडिओ बनवत होती. त्यावेळेस सुमारे 300 ते 400 लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओदेखील सध्या व्हायरल होतोय. पाकिस्तानमधील एका महिलेने या घटनेचा व्हिडिओ तिच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
तक्रारीत सांगितल्यानुसार, 300-400 लोकांचा जमाव त्यांच्या दिशेने जात होता. यादरम्यान महिलेचे कपडे फाडत तिला मारहाण झाली. यावेळी अनेकांनी महिलेला वाचव्याचा प्रयत्न केला, पण जमावासमोर त्यांचा टीकाव लागला नाही. जमावाने कपडे फाडून मारहाण करण्यासोबतच महिलेला हवेतही फेकले. लाहोर पोलिसांनी मंगळवारी शेकडो अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेत महिलेची अंगठी आणि कानातले, तिच्या एका साथीदाराचा मोबाईल फोन, ओळखपत्र आणि 15 हजार रुपये रोख हिसकावण्यात आले आहे. लाहोरचे पोलीस महानिरीक्षक (ऑपरेशन) साजिद कयानीने पोलीस अधीक्षकांना घटनेतील संशयितांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.