इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्याला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु त्या हल्ल्याशी संबंधित वेदना अजूनही कमी झालेल्या नाहीत. दक्षिण इस्रायलमधील सुपरनोव्हा म्युझिक कंसर्टमध्ये झालेल्या हल्ल्यातून वाचलेल्या शिरेल गोलन या मुलीने तिच्या २२ व्या वाढदिवशी टोकाचं पाऊल उचललं आहे. शिरेलने आत्महत्या केली आहे.
शिरेलच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, ७ ऑक्टोबरच्या घटनेनंतर ती पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने (PTSD) ग्रस्त होती. इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिरेल इस्रायलमधील पोराट येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर तिला दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शिरेलचा भाऊ इयाल म्हणाला की, त्याच्या बहिणीमध्ये PTSD ची लक्षणं दिसत होती. ती तिच्या मैत्रिणींपासून दूर राहत होती.
शिरेलचा भाऊ पुढे म्हणाला, मी पाहिलं की तिच्यामध्ये पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेसची लक्षणं आहेत. तिने स्वतःला वेगळं केलं होतं. मी तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं. शिरेलच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, सरकारने त्यांच्या कुटुंबाला गरजेच्या वेळी एकटं सोडलं. पुरेशी मदत मिळाली असती तर बहिणीचा मृत्यू टाळता आला असता.
इयालने शिरेल या हल्ल्यातून कशी वाचली ते देखील सांगितलं आहे. ती एका कारमधून बाहेर आल्यानंतर पोलिसांच्या वाहनाकडे धावली. या हल्ल्यात शिरेलचा जीव वाचला, मात्र तिच्या ११ मित्रांचा मृत्यू झाला. शिरेलच्या आईने तिची काळजी घेण्यासाठी आपली नोकरीही सोडली होती.