आजारपणामुळे लोकांसमोर असंख्य अडचणी येतात, पण ऑस्ट्रेलियात एक वेगळीच घटना घडली आहे. एक महिला चक्क आजारपणामुळे करोडपती झाली. लॉटरीमध्ये तिने तब्बल 5.2 कोटी रुपये जिंकले. हा आजार दुसरा तिसरा कोणता नसून तो कोरोना आहे. कोरोनाने जगाला वेठीस धरले असेल, पण हा व्हायरस या महिलेसाठी मात्र वरदान ठरला आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, जगात कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे तिला युरोपची ट्रिप रद्द करावी लागली. तसे झाले नसते तर तिने ही लॉटरी कधीच जिंकली नसती. तिने सांगितले की, युरोप ट्रिप रद्द झाल्यामुळे ती फिरायला जाऊ शकली नाही आणि लॉटरी जिंकण्याची संधी मिळाली.
ट्रिप रद्द केली अन् लॉटरीचं तिकीट घेतलं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण ऑस्ट्रेलियातील मॉर्फेट वेलमध्ये राहणाऱ्या या महिलेने मिलियन डॉलरची लॉटरी जिंकली. महिलेने सांगितले की, जर ती युरोपला गेली असती तर तिला लॉटरीचे तिकीट विकत घेता आले नसते. आता ती आणि तिचा पती मिळालेले पैसे नेमके कसे खर्च करायचे याचा विचार करत आहेत.
लॉटरीतून मिळालेली रक्कम खर्च करण्याबाबत बोलताना महिलेने सांगितले की, या पैशातून घराच्या आजूबाजूला काही दुरुस्तीचे काम करून घेतले जाईल. त्याचबरोबर तिने असेही सांगितले की, सध्या ती नोकरी करत आहे, मात्र आता इतके पैसे मिळाल्यानंतर लवकरच निवृत्तीचा विचारही करू शकते. एवढं मोठं बक्षीस जिंकण्याची संधी मिळाल्याने खूप नशीबवान असल्याचं तिने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.