लॉस एंजिल्स : २६ वर्षांच्या भारतीय महिलेवर मेंदूत वाढलेल्या ट्यूमरची शस्त्रक्रिया चालू असताना , तिच्या मेंदूत पूर्ण वाढ झालेला जुळे गर्भ मिळाला असून, डॉक्टरही चकित झाले आहेत. या गर्भांची हाडे विकसित असून, दात व केसही आलेले आहेत. यामिनी करनम असे या महिलेचे नाव असून, २६ वर्षांची ही युवती इंडियाना विद्यापीठातील पीएच.डी.ची विद्यार्थिनी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला वाचताना व बोलताना त्रास होऊ लागला. मूळ हैदराबादची असणाऱ्या करनमला डोकेदुखी इतकी तीव्र होती, की तिला खाणेही जमत नसे. करनमची तपासणी झाली तेव्हा तिच्या मेंदूतील पिनियल ग्लँड (मध्य मेंदूतील वाटाण्याच्या आकाराचा अवयव) वर ट्यूमर वाढला असे निदान करण्यात आले. यावर्षी मार्च महिन्यात यामिनी करनमला हरयार शाहिनियन हे डॉक्टर भेटले. लॉस एंजिल्स येथील स्कलबेस संस्थेत ते मेंदूला छिद्र पाडून शस्त्रक्रिया करतात. (वृत्तसंस्था)