दुबई - सध्या सोशल मिडीयाचा वापर लोक कसे करतील याचा नेम नाही. सोशल मिडीयाचा वापर करुन अनेकांना फसविण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र आता नवीन प्रकार आलाय ज्यामध्ये लोकांच्या भावनेला हात घालून त्यांच्याकडून पैसे कमविण्याचा. संयुक्त अरब अमीरात(UAE)मध्ये पोलिसांनी ऑनलाइन भिकारी बनून लोकांना फसविणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ही महिला सोशल मिडीयाचा वापर करुन लोकांना भावनिक करत त्यांच्याकडून पैसे लाटण्याचं काम करत होती.
मी घटस्फोटीत असून माझ्या मुलांचा संभाळ करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगून या महिलेने सोशल मिडीयावर तिचा आणि तिच्या मुलांचा फोटो शेअर केला. अवघ्या 17 दिवसात या महिलेने 35 लाख रुपये लोकांकडून जमा केले. मात्र ज्यावेळी या महिलेच्या पतीने मुलांचा फोटो सोशल मिडीयावर पाहिला त्यानंतर हा प्रकार समोर आला. आपल्या मुलांचा भिक मागण्यासाठी वापर केला जात असल्याचं पाहिल्यानंतर पतीने याबाबत पोलिसांत तक्रार केली.
दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने आरोपी महिलेने सर्वात आधी तिचे सोशल मिडीयावर अकाऊंट बनवले. त्यानंतर मुलांसोबतच्या फोटोचा वापर करत तिने लोकांकडे आर्थिक मदतीची विनवणी केली. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर तिने अनेकांची फसवणूक केली. दुबईचे पोलिस अधिकारी अल जल्लाफ यांनी सांगितले की, ही महिला लोकांकडे मी घटस्फोटीत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत अशी बतावणी करत असे. मात्र तिच्या नवऱ्याला मित्रांचे आणि नातेवाईकांचे फोन आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. तिने अवघ्या 17 दिवसांमध्ये 50 हजार डॉलर(35 लाख रुपये) लोकांकडून गोळा केले होते.
सोशल मिडीयाचा वापर करत लोकांना भावनिक करणे, आणि फसवणूक करणे याला दुबईत गुन्हा मानला जातो. त्यामुळे या महिलेला पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे. तसेच अशाप्रकारे सोशल मिडीयाचा गैरवापर करुन लोकांची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.