Iran News:इराणमध्ये हिजाबच्या विरोधात प्रचंड निदर्शने होत आहेत. महिला रस्त्यावर उतरल्या असून, अनेक ठिकाणी हिजाब जाळला जात आहे. यादरम्यान, इराणच्या सुरक्षा दलाकडून अनेक क्रूर कृत्य केले जात आहे. सुरक्षा दलाकडून निदर्शनात सहभागी असलेल्या 20 वर्षीय तरुणीची येथे निर्घृण हत्या करण्यात आली. हदीस नजाफी असे त्या तरुणीचे नाव असून, तिचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात ती आंदोलनात सहभागी झालेली दिसत आहे. विशेष म्हणजे, इराणमधील निदर्शनांदरम्यान आतापर्यंत किमान 57 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हदीस नजफीच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात तिच्या फोटोसमोर अनेकजण रडताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा दलांनी हदीसच्या पोटात, मानेवर, छातीवर, हातावर आणि चेहऱ्यावर गोळ्या घातल्या. हदीस महसा अमिनीच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या निदर्शनात सहभागी होण्याच्या तयारीत होती. यादरम्यान इस्लामिक रिपब्लिकच्या सुरक्षा दलांनी तिच्यावर गोळीबार केला.
रिपोर्ट्सनुसार, 21 सप्टेंबर रोजीच हदीसवर गोळीबार झाला होता. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिला वाचवता आले नाही. इराणमध्ये 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर महिलांनी हिजाबविरोधी आंदोलन पुकारले आहे. महसा अमिनीने हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते आणि पोलिस कस्टडीतच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिला पेटून उठल्या आहेत.