कोलंबो ।
श्रीलंकेत मागील ४ महिन्यांपासून खूप अराजकता माजली आहे. देशात इंधनाच्या समस्येपासून ते खाण्या-पिण्याच्या समस्येने लोकांना जीवन जगणे कठीण झालं आहे. देशात कायदा आणि सुव्यवस्था रस्त्यावर आली असतानाच परदेशी चलनाच्या कमतरतेमुळे आयात देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत देशामध्ये पेट्रोल-डिझेल यांसह जीवनाश्यक वस्तूंसाठी जनतेला संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेली श्रीलंका त्यातून बाहेर निघण्याची काही चिन्हं दिसत नसतानाच देशातील महिलांना सेक्स वर्कर बनण्यास भाग पाडले जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे काही महिलांना जीवनाश्यक वस्तूंच्या बदल्यात वेश्याव्यवसाय करावा लागत आहे.
माहितीनुसार, देशामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात आहे. बहुतांश स्पा सेंटरचे रूपांतर वेश्यालयामध्ये झाले आहे. श्रीलंकेतील वृत्तपत्र 'द मॉर्निंग'ने दिलेल्या माहितीनुसार, कपडा उद्योगात कार्यरत असलेल्या महिला देशावर ओढावलेल्या आर्थिक संकटामुळे बेरोजगार झाल्या आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी या महिलांना वेश्याव्यवसायाचा मार्ग अवलंबावा लागत आहे.
गारमेंट सेक्टर सोडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका महिलेने सांगितले की, "देशावर असलेल्या आर्थिक संकटामुळे सर्व कंपन्या बंद होत आहेत, त्यामुळे आमची नोकरी गेली आहे. या घडीला सेक्स वर्कर म्हणून काम केल्यानेच आम्हाला रोजगार मिळतो आहे. यापूर्वी आमचे मासिक वेतन २८,००० होते कधी-कधी ते ३५,००० च्या घरात देखील जायचे. मात्र वेश्याव्यवसायात सहभागी झाल्यामुळे आम्ही एका दिवसातच १५ हजारांपर्यंत कमवत आहोत. सगळ्यांना ही बाब पटणार नाही पण हे सगळं काही सत्य आहे."
जीवनाश्यक वस्तूंसाठी वेश्याव्यवसायलक्षणीय बाब म्हणजे श्रीलंकेमध्ये जीवनाश्यक वस्तू मिळवण्यासाठी महिलांना वेश्याव्यवसायाला सामोरं जावं लागत आहे. श्रीलंकेत आवश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. महिला जेव्हा दुकानांमध्ये अन्न, औषधं किंवा काही आवश्यक वस्तू घ्यायला जातात तेव्हा त्यांना बदल्यात सेक्ससाठी भाग पाडलं जातं. राजधानी कोलंबोच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील औद्योगिक परिसरात अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय वाढत चालला आहे.