तुम्ही पुरुष आहात की स्त्री? - तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न झाला? आणि तुम्ही कशासाठी विचारताहात हा प्रश्न?.. त्याचंही एक महत्त्वाचं कारण आहे; पण समजा तुम्ही पुरुष असाल, तर प्रत्येकानं प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही घरात किती कामं करता? तुमची बायको, आई, बहीण, मुलगी, एकत्र कुटुंबात राहात असाल, तर तुमची वहिनी, काकू... यांच्या तुलनेत घरातील कामाचा तुमचा वाटा किती?
याबाबतीत खात्रीनं सांगता येईल, घरातील कामांची जबाबदारी मुख्यत्वे असते, ही जबाबदारी स्वत:हून, स्वेच्छेने घेतात त्या महिलाच. या तुलनेत पुरुषांची स्थिती काय आहे? - सन्माननीय अपवाद वगळता, एकतर बहुसंख्य पुरुष घरातली कामं करतच नाहीत. केलीच तर ती दुसऱ्यावर उपकार केल्यासारखी आणि तेही शंभर वेळा बोलून दाखवतील... बघा, मी किती काम केलं! आजकाल अनेक घरात पुरुषाच्या बरोबरीनं स्त्रियाही बाहेर नोकरी करतात. दोघांनाही कामाचे टेन्शन्स, जबाबदाऱ्या असतातच; पण घरी आल्यावर महिला पुन्हा कामाला जुंपतात, तर पुरुष आराम फर्मावतात.
ही गोष्ट काही भारतातच आहे, असं नाही. संपूर्ण जगभरात हीच स्थिती आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला खरोखरच खूप काम करतात. कामाच्या रगाड्याखाली त्या अक्षरश: दबून गेलेल्या असतात, पिचलेल्या असतात; पण त्याचं कोणालाच काही सोयरसुतक नसतं. स्त्री-पुरुष समानता कागदावर अनेक ठिकाणी दिसेल; पण तशी परिस्थिती अपवादानंही कुठे नसेल, अशीच स्थिती आहे.
स्पेन सरकारनं मात्र आता या वस्तुस्थितीची सरकारी पातळीवर दखल घेतली आहे आणि त्यादृष्टीनं प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. याचाच पहिला भाग म्हणून स्पेननं एक खास प्रकारचं ॲप तयार करायला सुरुवात केली आहे. या ॲपच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक घरात प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री किती काम करते याची नोंद केली जाईल, त्याचं मोजमाप होईल. त्यानंतर या डाटाचा उपयोग करून स्पेन सरकार आपल्या ध्येयधोरणांमध्ये आणखी काही मूलभूत बदल करणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पुरुषांना घरात कामं करण्यासाठी प्रोत्साहित तर केलं जाईलच, शिवाय त्यांच्या घरकामाचे तासही मोजले जातील. या ॲपचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ॲपच्या माध्यमातून आपला पती घरात किती काम करतो, यावर महिलांना नजरही ठेवता येईल. मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला हातातल्या हातात हव्यात, एवढंसं काम करायला काय लागतं, असं म्हणणाऱ्या पुरुषांना त्या कामाची किंमत कळेल आणि त्यासाठी किती वेळ लागतो, काय काय करावं लागतं याचीही जाणीव होईल. घरगुती कामातील महिला आणि पुरुषांमधील असमतोल दूर करण्याच्या हेतूनं सरकारनं हे पाऊल उचललं आहे. जगभरातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
स्पेनच्या लैंगिक समानता आणि घरगुती हिंसाचारविरोधी एंजेला रॉड्रिग्ज यांच्या मते जगात कुठेही जा, सगळ्या कामांची जबाबदारी महिलांवरच, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी एकट्यानंच जीव काढायचा, नवरोबांनी मात्र ऐटीत बसून हुकूम सोडायचे.. असं कसं चालणार? पुरुषांनीही घरच्या जबाबदारीतला आपला वाटा उचलायलाच हवा. त्यांना त्यादृष्टीनं सक्षम करण्यासाठीच आम्ही काही पावलं उचलत आहोत.. महिलांच्या संदर्भात सर्वच, विशेषत: घरगुती पातळीवर केल्या जात असलेल्या भेदभावाविरोधात काय उपाययोजना केल्या जातील, यासंदर्भात संयुक्त राष्ट्र समितीची एक बैठक नुकतीच जिनिव्हा येथे झाली. त्यावेळी स्पेननं यासंदर्भात आम्ही एक खास ॲप तयार करीत असल्याची घोषणा केली.
एंजेला रॉड्रिग्ज म्हणतात, जवळपास प्रत्येक घरात कामाचं वाटप इतकं असमान पद्धतीनं केलेलं असतं की सगळा भार एकट्या स्त्रीवरच येतो. स्त्रिया करीत असलेली अनेक कामं तर अशी असतात, जी बऱ्याचदा ‘दाखवता’ही येत नाहीत; पण ही कामं जर केली नाहीत, तर कोणतंही घर सुरळीतपणे चालू शकणार नाही.
महिला म्हणतात, शेवटी मरण आमचंच! साधं घर झाडायचं किंवा स्वच्छ ठेवण्याची गोष्ट घ्या, समजा घर झाडायला वीस मिनिटं लागत असतील, दिवसातून दोनदा घर आवरावं, साफ करावं लागत असेल, तर त्यात त्या महिलेचा किती वेळ गेला? - अशी पाच-पाच, दहा-दहा मिनिटांची अनेक कामं त्या महिलेचा अख्खा दिवस खाऊन टाकतात. शिवाय या अदृष्य प्रेशरमुळे तिच्या शरीर-मनाची खिचडी होते ती वेगळीच! स्पेनमध्ये नुकतंच एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातही हजारो महिलांनी सांगितलं, आमचा नवरा, घरातले पुरुष ‘ऐतखाऊ’ आहेत! साधी इकडची काडीही ते तिकडे करीत नाहीत! मग शेवटी मरण आमचंच!