ओटावा : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट असते. सध्या प्री वेडिंग फोटोशूट, तसंच लग्नाचं फोटोशूट करण्याचा ट्रेण्ड आहे. लग्नातील प्रत्येक गोष्टी ठरवल्याप्रमाणे व्हाव्यात, असं सगळ्यांनाच वाटतं. पण तरीही लग्नामध्ये अशा काही गोष्टी घडतात त्या कायमस्वरुपी आठवणीत राहतात. असाच प्रसंग कॅनडातील एका लग्नात घडला. ओटावा येथील अॅन्टारिओ पार्कमधल्या तलावाकाठी प्रि-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या क्लेटनसाठी हा दिवस असाच वेगळ्या कारणासाठी स्मरणात राहील. कारण शूट करता करता त्याने अचानक तलावात उडी घेतली आणि एका बुडणाऱ्या मुलाला वाचवलं.
क्लेटन कूक त्याची पत्नी ब्रिटनीसोबत लग्नाचं फोटोशूट करत होता. त्यावेळी ऑन्टारिओ पार्कमधील तलावात एक मुलगा बुडत असल्याचं त्याने पाहिलं. क्षणाचाही विलंब न लावता, क्लेटनने तात्काळ तलावात उडी मारली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं. हॅट फोटोग्राफी फेसबुक पेजवर या संपूर्ण घटनेचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. क्लेटन्स हिरोईजम, असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.
लोकांनी क्लेटनने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे. अर्थात प्रि वेडिंग फोटोशूटला नवा कोरा कोट पाण्यात चिंब भिजवलेला नवरा पाहून त्या नवरीच्या भुवया ताणल्या जाण्याची शक्यता होती. पण नव्हे; तिनेही क्लेटनचं कौतुक केलं आहे.