कोरोना व्हायरसच्या साथीला अडीच वर्षांहून अधिक वेळ गेला असला तरी अद्यापही व्हायरसचा धोका संपलेला नाही. कोरोना व्हायरसची एन्ट्री झाल्यापासून सातत्याने नवनवीन स्ट्रेन आणि व्हेरिएंट समोर येत आहेत. जगभरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाच आता पुन्हा एकदा चीनने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनने झीरो कोविड पॉलिसी अंतर्गत ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत तिथे लॉकडाऊन लागू केला आहे.
चीनमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिग्गज कंपनी Apple च्या चीनमधील झेंगझाऊ येथील आयफोन फॅक्ट्रीतून एक लाखाहून अधिक कर्मचारी हे भीतीने पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फॅक्ट्रीच्या भिंतीवरून अनेकांनी उड्या मारल्या. याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. आयफोनचे सर्वात मोठे उत्पादन केंद्र झेंगझोऊ येथे आहे. ज्यात सुमारे 2 लाख कर्मचारी आहेत. एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर फॅक्ट्रीच्या असेंब्ली लाईनवर तैनात असलेल्या कामगारांना संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे.
कर्मचार्यांना अशा परिस्थितीत जीवाची भीती वाटू लागली असून त्यांनी हे काम सोडण्यास सुरुवात केली आहे. फॉक्सकॉनकडून असे सांगण्यात आले आहे की, फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा बाहेरील लोकांशी कोणताही संपर्क नाही आणि व्यवस्थापन संक्रमण नियंत्रित करण्यासाठी 'क्लोज-लूप' पद्धत अवलंबत आहे. फॉक्सकॉनने संक्रमित कर्मचार्यांची संख्या आणि त्यांच्या उपचार पद्धतींबद्दल देखील माहिती दिलेली नाही.
कोरोना संसर्गाच्या वाढीमुळे आयफोन उत्पादनावर होणाऱ्या परिणामाबाबत फॉक्सकॉनने सांगितले की, अशा प्रकारच्या शंका दूर करण्यासाठी इतर फॅक्ट्रीशी समन्वय साधेल. या फॅक्ट्रीतील किती कामगार निघून गेले हे स्पष्ट झालेले नाही. पण झेंगझोऊ फॅक्ट्रीतील कामगार आणि सोशल मीडिया फोरमवर उपलब्ध माहितीनुसार फॉक्सकॉनच्या फॅक्ट्रीतील सुमारे दहा लाख कामगार निघून गेले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.