वॉशिंग्टन:तालिबाननंअफगाणिस्तान काबीज केलें असेल, पण सरकार चालवणं त्यांच्यासाठी सोपं होणार नाही. अमेरिकेसह अनेक देश तालिबानवर आर्थिक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, अमेरिका आणि IMF नंतर आता जागतिक बँकेनंही तालिबानवर मोठी कारवाई केली आहे.
जागतिक बँकेच्या प्रवक्त्यानं सांगितल्यानुसार, जागतिक बँकेनं अफगाणिस्तानची आर्थिक मदत थांबवली आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती, विशेषत: महिलांच्या अधिकारांची परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आलं आहे. दरम्यान, जागतिक बँकेनं अफगाणिस्तानची सर्व आर्थिक मदत बंद केली असली, तरी ते देशाच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.
अमेरिका एक पैसा देणार नाही
जागतिक बँकेच्या कारवाईपूर्वीच अमेरिकेनं गेल्या आठवड्यात जाहीर केलं होतं की ते आपल्या देशातील अफगाणिस्तानचं सोनं आणि चलन साठा तालिबानच्या ताब्यात येऊ देणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानकडे केवळ अमेरिकेत सुमारे 706 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. अशा स्थितीत अमेरिकेचे हे पाऊल तालिबानसाठी मोठा झटका आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने अफगाणिस्तानला दिलेली आर्थिक मदतही थांबवली आहे. आयएमएफने अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या संसाधनांच्या वापरावरही बंदी घातली आहे.
आयएमएफने बंद केला अॅक्सेस
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अफगाणिस्तानला 46 कोटी डॉलर्स (3416.43 कोटी रुपये) देण्यात येणाऱ्या आणीबाणी राखीव फंडवर बंदी घातली आहे. सध्या जागतिक बँकेअंतर्गत अफगाणिस्तानमध्ये दोन डझनाहून अधिक प्रकल्प सुरू आहेत. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 2002 पासून जागतिक बँकेनं अफगाणिस्तानला 5.3 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत दिली आहे.