लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन देशातील तरुण पिढीला रोजगार व स्वयंरोजगारक्षम करण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी ‘स्किल इंडिया मिशन’ला जागतिक बँक २५ कोटी डॉलरचे कर्ज देऊन हातभार लावेल.जागतिक बँकेने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, बँकेच्या कार्यकारी मंडळाने २५० दशलक्ष डॉलरच्या ‘स्किल इंडिया मिशन आॅपरेशन’ला (सिमो) मंजुरी दिली आहे.यामुळे ३ ते १२ महिने किंवा ६०० तासांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कौशल्यविकास कार्यक्रमांची रोजगारक्षमतेच्या दृष्टीने उपयुक्तता वाढण्यास मदत होईल. परिणामी, भारताच्या विकास आणि समृद्धीत युवापिढी अधिक सक्रियतेने सहभागी होऊ शकेल, अशी बँकेला आशा आहे.या कार्यक्रमानुसार, १५ ते ५९ या वयोगटातील अर्ध वेळ काम करणाऱ्या किंवा बेरोजगार व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. याखेरीज दरवर्षी रोजगाराच्या बाजारात नव्याने येणाऱ्या १५ ते २९ या वयोगटातील १.२ कोटी युवक-युवतींचाही यात समावेश केला जाईल.भारत सरकारने सन २०१७ ते २०२३ या सहा वर्षांसाठी जे राष्ट्रीय कौशल्यविकास व उद्योजकता धोरण आखले आहे, त्यास मदत करण्यासाठी जागतिक बँकेचा हा ‘सिमो’ कार्यक्रम असेल. राष्ट्रीय कौशल्यविकास मिशनच्या माध्यमातून तो राबविला जाईल. बँकेचे भारतासाठीचे कन्ट्री डायरेक्टर जुनैद अहमद म्हणाले की, भारताच्या तरुण पिढीच्या मानवी संसाधनांमध्ये गुंतवणूक करणे, अधिक बिगरशेती रोजगार उपलब्ध करणे व रोजगारांमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांना बँकेच्या या कार्यक्रमाने मदत मिळेल.
कौशल्य विकासाला जागतिक बँकेचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 12:24 AM