रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. एकीकडे अमेरिकेसह सर्व नाटो देशांनी रशियाच्या आक्रमक कृतीचा निषेध केला आहे, तर दुसरीकडे भारत आणि चीनसारख्या मोठ्या राष्ट्रांनी या संपूर्ण वादावर तटस्थ भूमिका घेतली आहे. या तणावासाठी रशियाने अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना जबाबदार धरले आहे.
युनायटेड नेशन्समध्ये एका रशियन डिप्लोमॅटने म्हटले आहे, की अमेरिका आणि त्याचे पाश्चात्य सहयोगी युक्रेनला लष्करी कारवाई करण्यासाठी चिथावणी देत आहेत. सोमवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत, रशियन डिप्लोमॅट वसिली नेबेन्झिया यांनी युक्रेनवर, लुगांस्क आणि डोनेत्स्क प्रदेशात बॉम्ब फेकल्याचा आरोप केला.
या दोन्ही भागांना रशियाने युक्रेनपासून वेगळे प्रांत म्हणून मान्यता दिली आहे. ते म्हणाले, युक्रेनने पूर्व युक्रेनमध्ये 120,000 सैन्य तैनात केले आहे, जेथे रशियन समर्थक फुटीरतावादी सक्रिय आहेत. दरम्यान, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी रशियाच्या कारवाईला विरोध केला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले. राष्ट्रीय सुरक्षा अधिकार्यांशी झालेल्या बैठकीनंतर, मून जे-इन यांनी युक्रेन वादादरम्यान आर्थिक सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी रशियाला फटकारले आहे. रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्वाशी खेळ चालवला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर रशियावर निर्बंध लादण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. ते म्हणाले, जपान रशियावर कठोर निर्बंध लागू करण्याचा विचार करेल.
रशियासंदर्भात भारत आणि चीनची समान भूमिका -संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने कोणत्याही एका बाजूचे समर्थन किंवा विरोध करण्याऐवजी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय चीननेही भारताप्रमाणेच यामुद्द्यावर भाष्य करणे टाळले आहे. यूएन चार्टरनुसार हा वाद शांततेने सोडवला जावा, असे चीनचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रातील चीनचे राजदूत झांग जुन म्हणाले, सर्व बाजूंनी शांतता राखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि मुत्सद्दी मार्गाने विवाद सोडवण्यावर काम करायला हवे. याशिवाय, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, न्यूझीलंड, जर्मनी आणि फ्रान्सने रशियाला उघडपणे विरोध केला आहे.