वॉशिंग्टन : मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्याच्या किंवा त्यांच्या शिक्षणात अडथळे आणण्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला १५ ते ३० खर्व डॉलरचा फटका बसत असल्याचे जागतिक बँॅकेने मलाला दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. मुलींना न शिकवल्याची मोजावी लागलेली मोठी किंमत हा अहवालाचा विषय असून, त्यात म्हटले आहे. की, कमी उत्पन्न असलेल्या देशांतील दोन तृतीयांश मुली प्राथमिक शिक्षण पूर्ण करतात. एक चतुर्थांश मुली फक्त माध्यमिक शिक्षणाच्या पायरीपर्यंत जातात. अनेक महिलांना त्यांच्या लहानपणी माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण न मिळाल्याने मानवी भांडवल संपत्तीची मोठी हानी झाली आहे.
माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण झालेल्या महिलांना नोकरी किंवा व्यवसाय करायची इच्छा असते. या महिला निरक्षर महिलांपेक्षा दुप्पट पैसे कमावतात. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तिना जॉर्जिएव्हा यांनी सांगितले. शिक्षणातील असमानतेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला कित्येक खर्व डॉलरचा फटका बसत आहे. शिक्षण देताना केला जाणारा लिंगभेद मिटवायला हवा. मुले व मुलींना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी.
अहवाल म्हणतो की, जगभरातील ६ ते १७ वर्षे वयोगटातल्या मुलींपैकी १३.२ कोटी मुलींना शाळेत जाता आलेले नाही. इतक्या मोठ्या वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा जागतिक प्रगतीवरही विपरीत परिणाम होत आहे. महिला शिकल्यास ती कुटुंब नियोजनाकडे लक्ष देते. पर्यायाने लोकसंख्यावाढीवरही नियंत्रण राहते. बालविवाह व लहान वयातच माता होणे यामध्ये घट होते. यासंदर्भात अठरा देशांतील स्थितीचा अभ्यास करण्यात आला.मलाला दिनाची पार्श्वभूमीनोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसूफझाई हिने महिलांच्या शिक्षणासाठी स्वात खोऱ्यामध्ये जागृती मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी तिला २०१२ साली डोक्यात गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली. जगभरातील मुलींना शिक्षणाची संधी मिळायला हवी, असे आवाहन तिने आपल्या १६ व्या वाढदिवशी म्हणजे १२ जुलै २०१३ रोजी केले होते. त्यामुळे १२ जुलै हा मलाला दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले होते.