पेशावर : ‘नॅशनल जिओग्राफिक’ या ख्यातकीर्त नियतकालिकाने ३० वर्षांपूर्वी मुखपृष्ठावर छायाचित्र छापल्याने, सोविएत संघाने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आलेल्या लाखो निर्वासितांची ओळख ठरलेल्या आणि हिरव्या, भेदक डोळ्यांमुळे ‘ मोनालिसा आॅफ अफगाणिस्तान’ म्हणून जगभर प्रसिध्दी पावलेल्या शरबत बिवी ऊर्फ शरबत गुला या महिलेस पाकिस्तान सरकारने फसवणूक व भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक केली.बनावट दस्तावेजांच्या आधारे पाकिस्तानी नागरिकत्वाचे ओळखपत्र मिळविल्याच्या गुन्ह्याबद्दल पाकिस्तानच्या संघीय तपास यंत्रणेने (एफआयए) शरबत बिवीला पेशावर शहराच्या नोथिया भागातील तिच्या राहत्या घरातून अटक केली. गुन्हा सिद्ध झाल्यास तिला १४ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास व दोन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. राष्ट्रीय संगणकीकृत ओळखपत्र देण्याचे काम करणाऱ्या ‘नॅशनल डेटाबेस अॅण्ड रजिस्ट्रेशन अॅथॉरिटी’ने (एनडीआरए) केलेल्या फिर्यादीवरून दोन वर्षे तपास केल्यानंतर तपास यंत्रणेने ही कारवाई केली. शरबत बिवीकडे पाकिस्तान आणि अफगाण या दोन्ही देशांची नागरिक ओळखपत्रे मिळाली. ती जप्त करण्यात आली. (वृत्तसंस्था)फोटो जगभर गाजला... तालिबानींच्या बंदुकांना न जुमानता स्वत: शिक्षण घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी झटणारी मलाला नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्यावर अफगाणिस्तानची ओळख म्हणून जगापुढे येण्याआधी शरबत गुला ही जगाला परिचित झाली. ‘नॅशनल जिओग्राफिक’चे छायाचित्रकार स्टिव्ह मॅक्करी यांनी १९८४ मध्ये शरबत गुलाचे छायाचित्र घेतले तेव्हा ती अवघी १२ वर्षांची होती व पेशावर शहराच्या वेशीवर अफगाण निर्वासितांच्या छावणीत राहात होती.
जगप्रसिद्ध ‘अफगाण गर्ल’ला अटक
By admin | Published: October 27, 2016 2:32 AM