वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या प्रक्रियात्मक मतदानानंतर त्यांची दुसरी टर्म निश्चित झाली. WHO प्रमुख पदासाठी मे महिन्यात निवडणूक होणार आहे. मात्र त्यावेळी मतदानात ते एकमेव उमेदवार असणार आहेत.
WHO च्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे प्रमुख पॅट्रिक अमोथ म्हणाले, '16 ऑगस्ट 2022 पासून पाच वर्षांच्या अतिरिक्त कालावधीसाठी टेड्रोस काम पाहतील.' डॉ. टेड्रोस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दोन वर्षांपासून सतत चर्चेत राहिले आहेत. डब्ल्यूएचओ प्रमुखांच्या कार्यपद्धतीमुळे जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. विशेषत: आफ्रिकन देश त्यांच्या देशांकडे लक्ष दिल्याबद्दल आणि कोरोना लसीचा वाटा दिल्याबद्दल टेड्रोस यांचे विशेष आभार व्यक्त करत आहेत.
कोरोना महामारीबाबत दिला इशारासध्या जगभर कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिलाय की, येत्या काही दिवसात कोरोनाचे आणखी काही प्रकार येऊ शकतात. ओमायक्रॉन हा शेवटचा व्हेरिएंट आहे किंवा आपण महामारीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, असा समज मनातून काढून टाकावा, असे म्हटले आहे. याशिवाय, कोरोनाबाबत असलेले नियम पाळल्यास या वर्षीच्या अखेरपर्यंत ही महामारी संपुष्टात येऊ शकते, असेही डब्ल्यूएचओ प्रमुखांनी सांगितले आहे.