नवी दिल्लीजागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) भारताचा चुकीचा नकाशा वापरला जात आहे. भारताने यावर आक्षेप घेत 'डब्ल्यूएचओ'चे प्रमुख टेड्रोस घेब्रेसस यांना कडक शब्दांत चूक सुधारण्याबाबतची ताकीद दिली आहे.भारताच्या चुकीच्या नकाशा तातडीने मागे घेऊन योग्य नकाशा वापरण्यात यावा, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने डब्ल्यूएचओला लिहिलेल्या पत्रात नमूद केल्याची माहिती हिंदूस्तान टाइम्सने प्रकाशित केली आहे.
विशेष म्हणजे, WHO च्या या चूकीसाठी डिसेंबर महिन्यातही भारताने पत्र लिहीलं होतं. WHO ला पत्र लिहीण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे. गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधी असलेल्या इंद्रमणी पांड्ये यांनीही डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनाही चुकीच्या नकाशाबाबतची माहिती दिली होती.
डब्ल्यूएचओच्या संकेतस्थळावर, व्हिडिओ आणि नकाशांमध्ये भारताच्या सीमांची माहिती चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे, असं भारताने याआधीच स्पष्ट सांगितलं आहे. आता ८ जानेवारी रोजी इंद्रमणी पांड्ये यांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "डब्ल्यूएचओच्या विविध संकेतस्थळ आणि व्हिडिओंमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल आम्ही जाहीर नाराजी व्यक्त करत आहोत. यासंदर्भात याआधी पाठवलेल्या पत्रांचीही पुन्हा आठवण करु देऊ इच्छितो की ज्यात चुकीच्या नकाशाबाबतची तक्रार आम्ही दिली होती. डब्ल्यूएचओचे प्रमुख म्हणून आपण यात तातडीने लक्ष घालून चूक सुधारण्यात यावी.
WHO च्या नकाशात चुकीचं काय?डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हे प्रदेश वेगळ्या रंगात दाखविण्यात आले आहेत. यासोबतच पाकिस्तानने १९६३ साली चुकीच्या पद्धतीने चीनच्या हवाली केलेलं ५,१६९ किमी अंतरावर पसलेलं शक्सगाम खोरं देखील या नकाशात चीनचा भाग म्हणून दाखविण्यात आलं आहे. १९५४ साली चीनने जो अक्साई चीन प्रदेशावर कब्जा केला होता. त्या प्रदेशाला डब्ल्यूएचओने निळ्या रंगाच्या पट्ट्यांनी दाखवलं आहे. याच रंगात डब्ल्यूएचओने चीनचा नकाशा दाखवला आहे.
महत्वाची बाब म्हणजे, भारतीय कायद्यांनुसार देशाचा चुकीचा नकाशा दाखवणं हा गुन्हा आहे. यासाठी सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. 'डब्ल्यूएचओ'च्या कोविड-१९ ट्रॅकरचा संपूर्ण जगभरात वापर करण्यात येतो. याच ट्रॅकरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवणं हे अतिशय दुर्दैवी असल्याचं मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे. 'डब्ल्यूएचओ' आणि चीन यांच्या साटंलोटं असल्याचे आरोप याआधीपासून जागतिक राजकारणात करण्यात आले आहेत. अशात 'डब्ल्यूएचओ'नं भारताचा चुकीचा नकाशा दाखवणं हे देखील शंका निर्माण करणारं आहे.