कॅनबेरा : सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सर्वांत थंड (कमी उष्ण) तारा शोधला आहे. या तपकिरी ताऱ्याचा व्यास गुरूच्या जवळपास दोन तृतीयांश इतका आहे. विशेष म्हणजे त्यातून अजूनही किरणोत्सर्ग होत आहे.
संशोधनाचे मुख्य अभ्यासक कोवी रोज यांच्या मते, या ताऱ्याचे तापमान सुमारे ४२५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे, जे थंड होत असलेल्या स्टोव्हसारखे आहे. तो किती थंड आहे हे सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानावरून ठरवता येते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ५६०० अंश सेल्सिअस इतके आहे. सूर्यासारखे प्रचंड तारे जेव्हा त्यांच्या शिखरावर असतात तेव्हा चुंबकीय क्षेत्रे आणि रेडिओ लहरी निर्माण करतात, हे खगोलशास्त्रज्ञांना माहीत आहे. परंतु १०% पेक्षा कमी आकाराचे तारे अशा लहरी का निर्माण करतात याबद्दल खगोलशास्त्रज्ञांना अधिक माहिती उपलब्ध नाही.
हे दुर्मीळ...द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात कोवी रोझ म्हणाल्या की, अशा थंड ताऱ्याकडून किरणोत्सर्ग उत्सर्जित होणे दुर्मीळ आहे; कारण अशा ताऱ्यांमध्ये सहसा पृथ्वीच्या संदर्भात मोजता येणारे चुंबकीय क्षेत्र नसते.
फायदा काय? संशोधक रोझ यांच्या म्हणण्यानुसार, या शोधामुळे थंड ताऱ्यांची माहिती वाढेल आणि तारे कसे विकसित होतात आणि ते चुंबकीय क्षेत्र कसे निर्माण करतात हे समजू शकेल.