आपलं बाळ गोंडस, सुदृढ, रंगाने गोरंपान, सुंदर आणि गुटगुटीत असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशातच अनेकदा घरातील वडिलधारी माणसं त्या आईला अनेक सल्ले देतात. आहारात हे खा म्हणजे बाळ गुटगुटीत होईल.... किंवा हे खा म्हणजे बाळ गोरंपान होईल. पण आता कोणाचे सल्ले ऐकण्याची अजिबात गरज भासणार नाही. आता तुम्हाला हव्या तशा बाळाचा जन्म होऊ शकतो. थांबा... थांबा... गोंधळू नका... तुम्ही बरोबर ऐकलंत! आता तुम्हाला हव्या तशा बाळाला जन्म देणं शक्य होणार आहे. जेनेटिकली मॉडिफाइड किंवा डिझायनर बाळ तुम्हालाही होऊ शकतं. म्हणजे आता तुम्हीही डिझायनर बाळाला जन्म देऊ शकता.
सध्याचे युग हे टेक्नोसॅव्ही युग आहे, त्यामुळे कोणत्याबाबतीत चमत्कार घडेल सांगता येत नाही. असाच काहीसा चमत्कार चीनमध्ये करण्यात आला आहे. चीनने असा दावा केला आहे की, त्यांनी जेनेटिकली मॉडिफाय मानवाचं भ्रूण विकसित केलं आहे. जगातील सर्वात पहिलं जेनिटिकली मॉडिफाइड भ्रूण चीनने अमेरिकेआधी विकसित केल्याचा दावा चीनमधील एका संशोधकांनी केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, मानवी भ्रूण बदलण्यासाठी CRISPR नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. ही टेक्नॉलॉजी वापरून मानवाच्या जीन्समध्ये बदल करण्यात येतो. परंतु हे मॉडिफाइड भ्रूण अजून मानवी शरीरामध्ये सोडण्यात आलेलं नाही. या बाळाच्या डिएनएमध्ये बदल करण्यात आले असून संशोधकांकडून असाही दावा करण्यात आला आहे की, हे बाळ एचआयव्ही आणि कॉलरासारख्या गंभीर आजारांपासून मुक्त असेल.
जगभरातील वैज्ञानिकांनी यावर चिंता व्यक्त करत हे विज्ञान आणि नैतिकतेला धरून नसल्याचे सांगितले आहे. कारण यामुळे भविष्यात 'डिझायनर बेबी'चा जन्म होऊ शकतो. म्हणजेच बाळाचे डोळे, केस आणि त्वचेचा रंग अगदी तसा असेल जसा त्याच्या आई-वडिलांना हवा असेल. तेच या तंत्रज्ञानाच्या विकसित होण्याआधीच हे रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कारण यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागू नये.
चीनमधील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने मागील आठवड्यामध्ये एक रिपोर्ट पब्लिश केला होता. परंतु, याबाबतची सविस्तर माहिती रविवारी जर्नल 'नेचर'मधून जाहीर करण्यात आली. मॅगझिननुसार, CRISPR म्हणजेच क्लस्टर्ड रेगुलरली इनर्सपेस्ड शॉर्ट पिलंड्रोमिक रेपिट्सचा वपर करून डिझायनर बेबी तयार करण्यात येते.
काय आहे CRISPR तंत्रज्ञान?
जर्नल 'नेचर'नुसार, या संशोधनामध्ये क्रिस्पर/कॅस-9 या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये पेशींपर्यंत जाऊन डीएनएमधून रोगांच्या जीवाणूंना बाहेर काढलं जातं. 86 भ्रूणांवर हा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांसाठी त्यांना नियंत्रित वातावरणामध्ये ठेवण्यात आले. कारण CRISPR तंत्रज्ञानाचा परिणाम होण्यास दोन दिवस लागतात. दोन दिवसांनंतर 71 भ्रूण बचावले होते.
याआधी ब्रिटनमधील वैज्ञानिकांना मानवी भ्रूणाच्या डीएनए म्हणजेच जींन्समध्ये संशोधन करण्याची परवानगी मिळाली होती. त्यामागील हेतू मानवी जीवनाच्या सुरूवातीच्या काही क्षणांना जाणून घेणं हा होता. परंतु त्यावर पुढे काही काम करण्यात आले नाही.