सेऊल : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे एका इमारतीत बरीच कामे रोबोटच्या साहाय्याने केली जातात. ही जगातील पहिली रोबोट फ्रेंडली इमारत असून ती दक्षिण कोरियातील नेव्हर या तंत्रज्ञानविषयक कंपनीने बांधली आहे. यंदा जूनमध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीस ‘१७८४’ असे वैशिष्ट्यपूर्ण नाव देण्यात आले आहे. या अनोख्या वास्तूचे साऱ्या जगात कौतुक होत आहे.
सौदी अरेबियामध्ये निओम सिटी उभारली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या शिष्टमंडळाने नेव्हर कंपनीच्या रोबोट फ्रेंडली इमारतीला भेट देऊन तेथील सुविधांची नुकतीच पाहणी केली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील तज्ज्ञांनीही ही इमारत पाहिली.
१०० रोबोट, हजारो कर्मचारी कार्यरतदक्षिण कोरियाच्या नेव्हर या कंपनीने बांधलेल्या ‘१७८४’ या इमारतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ५ जी तंत्रज्ञान, क्लाऊड, सेल्फ ड्रायव्हिंग सर्व्हिस, रोबोट तंत्रज्ञान अशा अनेक सुविधा आहेत. तिथे १०० रोबोट व हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. नेव्हर ही कंपनी दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनचे संचालन करते. त्या सर्च इंजिनला कोरियाचे गुगल असेही म्हटले जाते. कोरोनासारख्या साथींमध्ये विषाणूंचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्याच्या दृष्टीने विचार करून त्याप्रमाणे या इमारतीतील प्रत्येक मजल्यावर हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आदी यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.
तुम्हाला रोबोट कशी मदत करेल?या इमारतीत सेल्फ ड्रायव्हिंग रोबोट ‘रुकी’ हा महत्त्वाचे आकर्षण आहे. तीन फूट उंचीचा हा रोबोट दिसायला वॉटर डिस्पेन्सरसारखा आहे. अशा प्रकारचे सुमारे १०० रोबोट कर्मचाऱ्यांसाठी भोजन, अन्य खाद्यपदार्थ, पार्सल, कागदपत्रांची डिलिव्हरी अशी कामे करतात. या रोबोटचे डोळे ॲनिमेटेड आहेत. ५ जी व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने रोबोटच्या हालचाली नियंत्रित होतात.