लंडन : पुरातत्त्व शास्त्रज्ञांना १३०० वर्षे जुना सोन्याचा हार सापडला आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला हा सगळ्यात महाग हार मानला जात आहे.
हार आणि इतर मौल्यवान वस्तू एप्रिलमध्ये नॉर्थम्प्टनशायरच्या काउंटीमध्ये स्थानिकांना सापडल्या होत्या. खजिना शोधून काढणाऱ्या लंडन पुरातत्त्व संग्रहालयातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, दागिने एका महिलेसोबत पुरण्यात आले होते. महिलेचा मृत्यू इसवी सन ६३० ते ६७० या वर्षातील असावा. खजिन्यात एक मोठा चांदीचा क्रॉस, दोन भांडी आणि तांब्याचे भांडेदेखील होते. त्यामुळे ती महिला शक्तिशाली आणि अत्यंत धार्मिक होती, असे दिसते. ही कबर एखाद्या श्रीमंत किंवा मग शाही कुटुंबातील महिलेची असावी, असा अंदाज आहे.
अनेक हार सापडलेजेव्हा मातीतून सोन्याचा छोटासा तुकडा चकाकताना दिसला, तेव्हाच मला वाटलं की हे काहीतरी महत्त्वाचे आहे, असे लेवॉन्ट-बेन्स बलाझ्स म्हणाले. ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी शाही कुटुंबातील महिलांच्या डझनभर कबरी सापडल्या आहेत. काही ठिकाणी असेच हार सापडले आहेत. ते सातव्या शतकापेक्षा जुने आहेत.