मुंबई - जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असणा-या इमान अहमदचे अबूधाबी येथील रूग्णालयात सोमवारी पहाटे निधन झाले. आज सकाळी 4.35 च्या सुमारास इमानने अखेरचा श्वास घेतला. इमानवर सर्वप्रथम मुंबईच्या चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात डॉ. मुफझ्झल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. इमानच्या बहिणीचे रुग्णालयाच्या डॉक्टरांबरोबर वाद झाल्यानंतर तिला अबूधाबी येथील बुरजील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते.
इमानला बुरजील रुग्णालयात आणल्यापासून वेगवेगळया 20 स्पेशलिस्ट डॉक्टरच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु होते. इमानचे ह्दय आणि किडनी व्यवस्थित कार्य करत नव्हती असे बुरजील रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. बुरजील रुग्णालयाने इमानची जी काळजी घेतली त्याबद्दल तिच्या कुटुंबियांनी आभार मानल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
इमानला मुंबईत आणले तेव्हा तिचे वजन 500 किलो होते. चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात डॉ. मुफझ्झल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने उपचार करुन इमानचे वजन 173 किलोने कमी केले. पण इमानची बहिण शायमा सेलिमनेला हा दावा मान्य नव्हता. डॉ मुफझ्झल लकडावाला खोटं बोलत असल्याचा आरोप तिने केला होता. इमानच्या उपचारावर सैफी रुग्णालयाने 2 कोटी रुपये खर्च केले.
इमानला अबूधाबीला नेल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं बुरजील रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं. इमान आता तोंडाने खाऊ शकते महत्वाचे म्हणजे ती स्वतःच्या हाताने जेवायचा सराव करते आहे असे रुग्णालयाने म्हटले होते. "सुरूवातीला इमानला दोन-तीन चमचे अन्न दिलं जातं होतं. पण आता ती दिवसाला पंधरा चमचे अन्न खायला लागली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे गेली दोन दिवस ती आर्ध्यापेक्षा जास्त जेवण स्वतःच्या हाताने खाते आहे", अशी माहिती बुर्जील हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकिय अधिकारी अल्ल शाहत यांनी दिली होती.
मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये इमानवर बॅरिऍट्रिक सर्जरी करण्याआधी तीला लिक्विड डाएटवर ठेवण्यात आलं होतं. तोंडाने खायला दिल्यास मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम होऊ नये, यासाठी तीला अशा पद्धतीचं डाएट देण्यात आलं होतं.
बुरजील रुग्णालयात इमानवर उपचारासाठी ऑर्थोपेडीक सर्जन, ह्रदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्त्रोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, फिजीओथिएरिपिस्ट तसंच आहास तज्ज्ञांच पथक तयार करण्यात आलं होतं. इमानवर उपाचारासाठी तीन स्टेजचं मॉडेल या डॉक्टरांच्या टीमने तयार केलं होतं
- अलेक्झांड्रिया स्थित 36 वर्षीय इमान अहमद अब्दुलाती गेल्या 25 वर्षांपासून घराबाहेर पडलेली नव्हती.
- इमानला मुंबईत आणले तेव्हा तिचे वजन 500 किलो होते.
- जेव्हा इमानचा जन्म झाला होता तेव्हा तिचे वजन 5 किलोग्रॅम होते. मात्र 11 वर्षानंतर तिचे वजन झपाट्याने वाढू लागले. ते इतके वाढले की तिला स्वत:च्या पायावर उभेही राहता येत नव्हते.