ऑस्ट्रेलियामध्ये एका विषारी ब्ल्यू-रिंग्ड ऑक्टोपसने (Blue-ringed Octopus) एका महिलेस तब्बल दोन वेळा चावा घेतला. या ऑक्टोपसचा जगातील सर्वात विषारी प्राण्यामध्ये समावेश केला जातो. मात्र या विषारी ऑक्टोपसने चावा घेऊनही या महिलेवर कोणताही परिणाम झाला नाही आणि ती जिवंत राहिली.
NSW एम्ब्युलन्सच्या रिपोर्टनुसार, 16 मार्च रोजी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील समुद्रकिनाऱ्यावर पोहत असताना एका महिलेला कवच सापडले. या कवचामध्ये एक निळ्या रंगाचा ऑक्टोपस होता. या ऑक्टोपसने महिलेच्या पोटावर दोन वेळा चावा घेतला. यामुळे महिलेच्या पोटात वेदना सुरू झाल्या. यानंतर पॅरामेडिक्सच्या टीमने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले.
एक थेंब अन् एका मिनिटात 26 लोकांचा मृत्यू - पॅरामेडिक्सच्या पथकाने संबंधित महिलेला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले. ज्या ठिकाणी ऑक्टोपसने महिलेला चावा घेतला होता ती जागा थंड पाण्याने शेकण्यात आली. यावर ख्रिश्चन होम्स यांनी फेसबुकवर म्हटले आहे, आमच्यासाठी निळ्या-रिंग्ड ऑक्टोपसच्या चाव्याशी संबंधित बातमी दुर्मिळ आहेत, कारण ते अत्यंत विषारी आहेत. त्यांचे विष सायनाईडपेक्षाही 1000 पट अधिक घातक असते. त्याच्या विषाच्या एका थेंबत, एका मिनिटात 26 लोकांना मारण्याची क्षमता आहे. निळा-रिंग्ड ऑक्टोपस केवळ 12 ते 20 सेमी (5 ते 8 इंच) एवढा लांब असतो.
छोटे ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस एवढे आक्रमक नसतात - ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस चावल्यानंतर, शरिरात एक शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन तयार होते. ते न्यूरॉन सिग्नल एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यापासून रोखते. यामुळे स्नायू सुन्न होतात. यामुळे संबंधित व्यक्तीला दिसण्यास समस्या निर्माण होते. याशिवाय श्वास घेण्यासही समस्या निर्माण होते. मात्र छोटे सेफलोपोड्स ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस एवढे आक्रामक नसतात. ते केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठीच चावतात.